कारला धडक मारल्याच्या रागातून कॅब चालकाला मारहाण, दोघांच्या विरोधात गुन्हा दाखल

घाटकोपर, 31 ऑगस्ट: (विश्वजीत खाटमोडे) घाटकोपर परिसरात कॅब चालकावर हल्ला केल्याप्रकरणी दोघांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. कारला धडक मारल्याच्या रागातून एका कार चालकाने कॅब चालकाला मारहाण केली आहे. पोलिसांनी पीडित चालक कयामुद्दीन मैनुद्दीन कुरेशी (24) यांच्या तक्रारी आणि सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे गुन्हा दाखल केला आहे. याप्रकरणी त्यांच्या विरोधात बीएनएस (भारतीय न्यायिक संहिता) कलम 115,117, 351 (2) आणि 352 अंतर्गत एफआयआर नोंदवण्यात आला आहे. ऋषभ चक्रवर्ती असे आरोपीचे नाव असून तो व्यवसायाने पत्रकार आहे. याप्रकरणात पोलिसांनी पत्रकार ऋषभ चक्रवर्ती आणि त्यांच्या पत्नीचे जबाब नोंदवले आहेत.

https://x.com/ANI/status/1829760253010792793?s=19

अशी घडली घटना

यासंदर्भात पार्कसाइट पोलिस स्टेशनचे वरिष्ठ पोलिस अधिकारी संतोष घाटेकर यांनी सांगितले की, घाटकोपरमधील असल्फा गावाजवळ ऋषभ चक्रवर्तीने त्याच्या कारने कॅबला धडक दिली. त्यानंतर या कॅब चालकाने त्याला थांबवले आणि त्याच्या वाहनाच्या झालेल्या नुकसानीची भरपाई मागितली. मात्र चक्रवर्ती याने त्याकडे लक्ष न देता तेथून पळ काढला. त्यानंतर या कॅब चालकाने ऋषभ चक्रवर्ती याच्या कारचा पाठलाग करून घाटकोपर येथील एलबीएस मार्गावरील त्यांच्या निवासस्थानाकडे धाव घेतली. त्यानंतर जेव्हा चक्रवर्ती यांनी त्यांची कार थांबवली तेव्हा कॅब चालकाने त्यांच्या कारला पाठीमागून धडक दिली.

घटनेचा व्हिडिओ व्हायरल

या घटनेनंतर ऋषभ चक्रवर्तीने पीडित कॅब चालकाला चापट मारली आणि त्याला जमिनीवर उचलून खाली आपटले. या घटनेचे सीसीटीव्ही फुटेज देखील समोर आले आहे. या घटनेत गोवंडी येथील निवासी कॅब चालक कामुद्दीन मनुद्दीन कुरेशी हे गंभीर जखमी झाले आहेत. त्यानंतर सुरक्षा कर्मचाऱ्यांनी त्यांना राजवाडी येथील रुग्णालयात दाखल केले होते. परंतु डोक्यावर जखमेच्या खुणा दिसल्यानंतर त्यांना जेजे रुग्णालयात दाखल करण्यात आले. या प्रकरणाचा तपास सध्या मुंबई पोलीस करीत आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *