महात्मा गांधी यांच्या स्मृतिदिनानिमित्त बारामतीत हुतात्मा दिनाच्या कार्यक्रमाचे आयोजन; सर्व नागरिकांनी कार्यक्रमाला उपस्थित राहावे

बारामती, 17 जानेवारी: महात्मा गांधी यांच्या स्मृतिदिनानिमित्त बारामती तालुका स्वातंत्र्य सैनिक संघटना व बारामती तालुका स्वातंत्र्य सैनिक उत्तराधिकारी संघटनेच्या वतीने बारामती येथे मंगळवार दिनांक 30 जानेवारी 2024 रोजी सकाळी 10 वाजून 59 मिनिट ते 11 वाजून 03 मिनिटापर्यंत हुतात्मा दिनाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. या कार्यक्रमाचे आयोजन बारामती येथील हुतात्मा स्तंभ वंदे मातरम चौक (भिगवण चौक) याठिकाणी करण्यात आले आहे.



तरी बारामतीतील सर्व नागरिकांनी, बारामती नगर परिषद आजी माजी अध्यक्ष, उपाध्यक्ष, नगरसेवक, मुख्याधिकारी, सर्व अधिकारी, कर्मचारी, बारामती शहर व ग्रामीण पोलीस स्टेशन अधिकारी, कर्मचारी, सरकारी व निमसरकारी अधिकारी, व्यापारी,विद्यार्थी, विद्यार्थिनी, सर्व शाळा, कॉलेज, शिक्षक, प्राध्यापक, डॉक्टर, वकील, पत्रकार, संपादक, सर्व बँकेचे अधिकारी, कर्मचारी, सर्व राजकीय पक्षाचे पक्षाचे अध्यक्ष, उपाध्यक्ष, पदाधिकारी, कार्यकर्ते, सर्व कॉलेजचे संचालक, प्राध्यापक, विद्यार्थी, विद्यार्थिनी, कामगार संघटना, सर्व स्तरातील सेवाभावी संस्थेचे पदाधिकारी, गणेश मंडळ, दहीहंडी संघाचे अध्यक्ष, कार्यकर्ते इत्यादी सर्व बारामतीतील तळागाळातील घटकांनी या दिवशी हुतात्मा दिनास राष्ट्रीय पोशाखात 15 मिनिटे अगोदर उपस्थित राहावे, अशी विनंती बारामती तालुका स्वातंत्र्य सैनिक संघटना, बारामती, बारामती तालुका स्वातंत्र्य सैनिक उत्तराधिकारी संघटना, बारामती आणि निलेशभाई कोठारी यांच्या वतीने करण्यात आली आहे. याशिवाय, सरकारी ऑफिस, बँक, शाळा, महाविद्यालयांच्या आवारात 30 जानेवारी रोजी सकाळी 10 वाजून 59 मिनीटापासून 11 वाजून 03 मिनिटापर्यंत स्तब्धता पाळून हुतात्मा दिन पाळावा, अशी विनंती देखील करण्यात आली आहे.

दरम्यान, दिनांक 30 जानेवारी 1948 रोजी प्रार्थना सभेत महात्मा गांधीजी यांची हत्या करण्यात आली. ज्या महात्मा गांधीजींनी साधी राहणी व उच्च विचार सारणी अंगीकृत करून या देशातील गरीब जनतेला अंगावर नेसावयास कपडा नसल्याने स्वतः साधा खादीचा पंचा व खादीचे उपरणे परिधान केला. आपल्या भारत देशाची ग्रामीण अर्थव्यवस्था ग्रामस्वराज्य या दृष्टीने त्याकाळात बळकट होती. ती ब्रिटिशांनी उद्धवस्त केली होती. तिचे पुनर्जीवन करण्याचा महात्मा गांधीजींनी ध्यास घेतला होता. तसेच त्यांनी स्वच्छतेचे महत्व त्याकाळी सांगितले होते. त्याची आज देशाला गरज आहे .तरी सर्वांनी आपले घर व परिसर स्वच्छ ठेवावा. म्हणजे संपूर्ण देश स्वच्छ व सूंदर होऊन भारतातील सर्व नागरिक निरोगी राहतील व भारतातील प्रत्येक नागरिकाने कमीत कमी एकतरी खादीचा पोशाख परिधान करावा हीच खरी महात्मा गांधीजींना आदरांजली (श्रद्धांजली) होईल व महात्मा गांधीजींचे खऱ्या अर्थाने स्वप्न पूर्ण होईल. संपूर्ण जगामध्ये या महामानवाचे अनेक देशात त्यांची स्मृती आणि आठवण साजरी केली जाते.

अनेक जागतिक जेष्ठ विचारवंतांनी असे कथन केले आहे की, अशा प्रगल्भ विचारांचा आणि कृतीशीलतेचा माणूस की जो हाडामासांनी शरीर बनवलेला असा होऊन गेला यावर शरीर विज्ञान ही आश्चर्य व्यक्त करील. जरी 30 जानेवारी 1948 साली महात्मा गांधीजींचे शरीर संपविण्यात आले, तरी त्यांचे विचार आणि आचार हेच आजच्या घडीला तारून नेऊ शकतील आणि म्हणून त्या स्मृतिदिनाच्या दिवशी हुतात्मा दिन म्हणून ओळखला जातो. या दिवशी हुतात्मा दिनाच्या कार्यक्रमात सकाळी 10 वाजून 59 मिनिट ते 11 वाजेपर्यंत प्रथम सायरन वाजविण्यात येईल, त्यानंतर 2 दोन मिनिटे स्तब्धता पाळावी व त्यानंतर पुन्हा 11 वाजून 02 मिनिटांनी सायरन चालू होऊन 11 वाजून 03 मिनीटांनी हा सायरन समाप्त होईल. त्यानंतर वंदेमातरम हे गीत होईल. यावेळी सर्व जगात हुतात्मा दिन साजरा करून महात्मा गांधीजींचे आचार व विचार प्रत्यक्ष कृतीत आणण्यासाठी शपथबद्ध होऊया.

दरम्यान, बारामती तालुका स्वातंत्र सैनिक संघटना, बारामती हे 1949 सालापासून हुतात्मा दिन पाळत आले आहेत. सदरील दिवशी भारतामध्ये भारत देश स्वातंत्र्य करण्यापासून ते आज पर्यंत भारत देशाची सेवा करताना ज्यांनी- ज्यांनी स्वतःच्या प्राणाची आहुती व बलिदान दिले आहे. त्यांचे कृतज्ञता व आठवण व्यक्त करण्यासाठी व नवीन येणाऱ्या पिढीला जुन्या इतिहासाची माहिती मनामध्ये ज्वलंत राहण्यासाठी आदरांजलीचा (श्रद्धांजलीचा) कार्यक्रम वार मंगळवार दिनांक 30 जानेवारी 2024 रोजी संपूर्ण देशात हुतात्मा दिन म्हणून होत असतो. हुतात्मा दिन हा नुसता भारत देशातच नव्हे, तर संपूर्ण जगात 30 जानेवारी रोजी भारत देशाच्या वेळेनुसार 10 वाजून 59 मिनिट ते 11 वाजून 03 मिनिटापर्यंत स्तब्धता पाळून हुतात्मा दिन पाळला जातो.

One Comment on “महात्मा गांधी यांच्या स्मृतिदिनानिमित्त बारामतीत हुतात्मा दिनाच्या कार्यक्रमाचे आयोजन; सर्व नागरिकांनी कार्यक्रमाला उपस्थित राहावे”

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *