बारामती, 13 ऑगस्टः स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवाचे औचित्य साधून पंचायत समिती बारामतीच्या वतीने तालुक्यात ‘घरोघरी तिरंगा’ अभियानाअंतर्गत विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. या उपक्रमात बारामती तालुक्यात ग्रामपंचायत स्तरावर राष्ट्रध्वजाची उपलब्धता करून देण्यात आली आहे. गावोगावी ज्येष्ठ नागरिकांच्या हस्ते वृक्षारोपण लागवडीसाठी रोपांची वाटप करण्यात आले. घरोघरी राष्ट्रध्वज फडकवण्यासाठी पंचायत समितीमार्फत गावपातळीवर जनजागृती करण्यात येत आहे.
बारामतीत भाजपची तिरंगा रॅली
महिला व बालकल्याण विभागातर्फे बाल गोपाळ पंगत, किशोरी मेळावा, महिला मेळाव्याचे आयोजन सुरु आहे. शिक्षण विभागाकडून विद्यार्थ्यांची प्रभात फेरी, वकृत्व स्पर्धा, रांगोळी स्पर्धा व निबंध स्पर्धा याचे शालेय स्तरावर आयोजन करण्यात येत आहे. आरोग्य विभागाकडून प्रत्येक उपकेंद्रात आरोग्य तपासणी शिबीर आयोजित करण्यात येत आहे. तालुक्यात ‘स्वराज सप्ताह’ साजरा करण्यात येत आहे, अशी माहिती गट विकास अधिकारी डॉ. अनिल बागल यांनी दिली आहे.
ग्रामपंचायत मुर्टी येथील श्री छत्रपती शिवाजी विद्यालयातील विद्यार्थांना निहित संगम फाउंडेशनच्या वतीने मोफत राष्ट्रध्वजाचे वाटप करण्यात आले. यावेळी विद्यार्थ्यांची प्रभातफेरी काढण्यात आली. विद्यार्थ्यांनी कवायती सादर केल्या. घरोघरी राष्ट्रध्वज फडकवण्यासाठी विद्यार्थांना मार्गदर्शन करण्यात आले. या उपक्रमात मुर्टी गावचे सरपंच, ग्रामपंचायत सदस्य, ग्रामस्थ, पंचायत समितीचे अधिकारी, कर्मचारी, मुख्याध्यापक, शिक्षक, शिक्षकेत्तर कर्मचारी व विद्यार्थांनी सहभाग घेतला.
भारतीय स्वातंत्र्याला 75 वर्षे पुर्ण होत असल्याच्या पार्श्वभुमीवर जनतेच्या मनात स्वातंत्र्य लढ्याच्या स्मृती तेवत राहव्यात यासाठी 13 ते 15 ऑगस्ट 2022 या कालावधीत ‘घरोघरी तिरंगा’ हा उपक्रम राबविण्यात येत आहे. नागरिकांनी आपापल्या घरावर राष्ट्रध्वज उस्फुर्तपणे फडकवावा, असे आवाहन गट विकास अधिकारी डॉ. बागल यांनी केले आहे.