बारामती, 22 डिसेंबर: (विश्वजीत खाटमोडे) गेल्या महिन्यात बारामती तालुक्यातील अनेक ग्रामपंचायतींची निवडणूक पार पडली होती. या ग्रामपंचायतींमधील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या नवनिर्वाचित सरपंच आणि उपसरपंच यांच्या सत्कार समारंभाचे आयोजन करण्यात आले आहे. यासोबतच राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या कार्यकर्ता मेळाव्याचे ही आयोजन करण्यात आले आहे. या कार्यक्रमाचे आयोजन बारामती तालुका व शहर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या वतीने करण्यात आले आहे. हा कार्यक्रम 24 डिसेंबर रोजी दुपारी 1:30 वाजता बारामती शहरातील भिगवण रोड परिसरातील सहयोग सोसायटी समोरील राजमाता जिजाऊ भवन याठिकाणी आयोजित करण्यात आला आहे.
या कार्यक्रमाला राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार हे उपस्थित राहणार आहेत. यावेळी अजितदादा यांच्या हस्ते राष्ट्रवादी पक्षाच्या निर्वाचित सरपंच आणि उपसरपंच यांचा सत्कार करण्यात येणार आहे. हा कार्यक्रम राष्ट्रवादी काँग्रेसचे पुणे जिल्हाध्यक्ष श्री प्रदिपदादा गारटकर यांच्या अध्यक्षतेखाली पार पडणार आहे. त्यासोबतच या कार्यक्रमाच्या ठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा कार्यकर्ता मेळावा देखील आयोजित करण्यात आलेला आहे.
या कार्यक्रमाला बारामती तालुका व शहर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या सर्व कार्यकर्ते, ग्रामपंचायतींचे सर्व पदाधिकारी, विविध संस्थांचे सर्व पदाधिकारी, नगर परिषद, पंचायत समिती तसेच जिल्हा परिषदेचे आजी-माजी पदाधिकारी यांच्यासह राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन राष्ट्रवादी काँग्रेसचे बारामती तालुकाध्यक्ष संभाजी होळकर व शहराध्यक्ष जय पाटील, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी तालुका व शहर सोशल मीडिया अध्यक्ष सूर्यकांत पिसाळ आणि तुषार लोखंडे यांनी केले आहे.