मुंबई, 26 फेब्रुवारीः (विश्वजीत खाटमोडे) राज्य विधिमंडळाचे अर्थसंकल्पीय अधिवेशन आजपासून सुरू होत आहे. अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या आजच्या पहिल्या दिवशी विरोधक आक्रमक झाल्याचे पाहायला मिळाले. मराठा आरक्षण संदर्भात फसवणूक नको, मराठा समाजाला आरक्षण द्या, अशी मागणी विरोधी पक्षांनी केली आहे. त्यासाठी महाविकास आघाडीच्या वतीने विधिमंडळाच्या पायऱ्यांवर राज्य सरकारच्या विरोधात आज आंदोलन करण्यात आले. या आंदोलनात विधानसभेचे विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार, काँग्रेस नेते बाळासाहेब थोरात, अमित देशमुख, धीरज देशमुख, राष्ट्रवादी शरद पवार गटाचे नेते अनिल देशमुख यांसारखे विविध नेते सहभागी झाले होते.
https://twitter.com/MeDeshmukh/status/1761989537117655267?s=19
विरोधकांच्या सरकारच्या विरोधात घोषणा
यावेळी महाविकास आघाडीच्या नेत्यांनी बॅनर झळकावून राज्य सरकारच्या विरोधात घोषणाबाजी केली. तसेच त्यांनी फसवणूक नको, मराठा समाजाला आरक्षण द्या, अशी मागणी राज्य सरकारकडे केली आहे. सरकारने मराठा समाजाची पुन्हा फसवणूक केली आहे. आरक्षणाच्या नावाखाली मराठा समाजाच्या तोंडाला पाने पुसली आहेत. कोर्टात न टिकणारं आरक्षण दिलं आहे, असे विजय वडेट्टीवार म्हणाले आहेत.
जरांगेंच्या सर्व आरोपांची चौकशी व्हावी
दरम्यान, आरक्षणाच्या मुद्द्यावरून विरोधक आक्रमक झाले आहेत. तसेच मनोज जरांगे पाटील यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर गंभीर आरोप केले होते. या आरोपांची चौकशी झाली पाहिजे, अशी मागणी विरोधी पक्षांनी केली आहे. जरांगेंनी केलेल्या या आरोपांच्या मुळापर्यंत जाण्यासाठी चौकशीची आवश्यकता आहे. राज्य सरकारने धाडस दाखवून या आरोपांची चौकशी तातडीने हाती घ्यायला हवी, अशी मागणी विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी केली आहे.
मराठा आरक्षणाचा मुद्यावरून सरकार आणि विरोधक आमनेसामने!
त्यामुळे या अर्थसंकल्पीय अधिवेशनात मराठा आरक्षणाचा मुद्दा गाजण्याची शक्यता आहे. या अधिवेशनात राज्य सरकार विरोधकांना कसे सामोरे जाणार? हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे. तसेच राज्यात सगेसोयरे अध्यादेशाची अंमलबजावणी करण्यासंदर्भात सरकार कोणती भूमिका घेणार आणि सरकार मनोज जरांगे यांचे आंदोलन कशा पद्धतीने हाताळणार? याकडे ही मराठा समाजाचे लक्ष लागले आहे.