दिल्ली, 13 मे: (विश्वजीत खाटमोडे) ‘ऑपरेशन सिंदूर’च्या यशानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सोमवारी (दि.12) देशाला संबोधित केलं. त्यांनी सांगितलं की, गेल्या काही दिवसांत भारताच्या धैर्याचं आणि संयमाचं उदाहरण जगासमोर आलं आहे. त्यांनी हा पराक्रम देशातील सर्व माता, बहिणी आणि मुलींना समर्पित केला आणि भारतीय लष्कराचं कौतुक केलं.
https://x.com/PTI_News/status/1921953239945330943?t=Xcracmfngj1M0uSjzPEP4Q&s=19
वीर जवानांना पंतप्रधानांचा सलाम
पंतप्रधान मोदी म्हणाले, “गेल्या काही दिवसांत आपण आपल्या देशाची शक्ती आणि शांतता कशी आहे? हे पाहिलं. मी सर्व भारतीयांच्या वतीने आपल्या सैनिकांना, सुरक्षा यंत्रणांना, गुप्तचर संस्थांना आणि वैज्ञानिकांना सलाम करतो. ‘ऑपरेशन सिंदूर’च्या यशासाठी आपल्या सैनिकांनी मोठं शौर्य दाखवलं. त्यांचा हा पराक्रम मी देशातील प्रत्येक स्त्रीला समर्पित करतो.”
पहलगाममधील हल्ल्याची आठवण
22 एप्रिल रोजी जम्मू-काश्मीरमधील पहलगाम येथे दहशतवाद्यांनी निर्दय हल्ला केला होता. सुट्टीसाठी गेलेल्या नागरिकांना त्यांनी धर्म विचारून, त्यांच्या कुटुंबासमोर ठार मारलं. या घटनेनंतर सरकारने लष्कराला कारवाईसाठी मोकळीक दिली.
दहशतवाद्यांना कडक इशारा
पंतप्रधानांनी सांगितलं की, “दहशतवाद संपवण्यासाठी आम्ही आपल्या लष्कराला पूर्ण अधिकार दिले आहेत. आता दहशतवादी आणि त्यांच्या संघटनांना हे समजलं आहे की भारताच्या बहिणींवर आणि मुलींवर हल्ला केल्यास त्याचे गंभीर परिणाम होतील. ‘ऑपरेशन सिंदूर’ हे केवळ नाव नाही, तर देशाच्या भावना आणि ताकदीचं प्रतीक आहे.”
100 हून अधिक दहशतवाद्यांचा खात्मा
पंतप्रधान मोदींनी सांगितलं की, या कारवाईत 100 हून अधिक दहशतवाद्यांचा खात्मा झाला आहे. भारतविरोधात कट रचणारे अनेक मोठे दहशतवादी एका कारवाईत मारले गेले. तसेच गेल्या अडीच ते तीन दशकांपासून पाकिस्तानमध्ये भारताविरुद्ध उघडपणे कट रचणाऱ्या अनेक दहशतवादी सूत्रधारांना भारताने एकाच हल्ल्यात ठार मारले आहे.
पाकिस्तानवर टीका
पाकिस्तानच्या भूमिकेवर टीका करत पंतप्रधान म्हणाले की, “भारताच्या कारवाईनंतर पाकिस्तान निराश आणि हताश झाला आहे. त्यातूनच त्यांनी दुसऱ्या एका अतिरेकाच्या प्रयत्नाची हिंमत केली. भारताच्या कारवाईला पाठिंबा देण्याऐवजी पाकिस्तानने भारतालाच लक्ष्य करणे सुरू केले. त्यांनी शाळा, महाविद्यालये, मंदिरे, गुरुद्वारे आणि सामान्य नागरिकांच्या घरांवर हल्ले केले. सैनिकी ठिकाणांनाही लक्ष्य करण्यात आले. पण यातही पाकिस्तानचा खरा चेहरा जगासमोर आला. जगाने पाहिले की पाकिस्तानचे ड्रोन आणि क्षेपणास्त्रे भारतासमोर कशी निष्प्रभ ठरली.”