बारामती कृषि उत्पन्न बाजार समितीत कापसाचा उघड पद्धतीने लिलावाचा शुभारंभ

बारामती, 19 नोव्हेंबर: (विश्वजीत खाटमोडे) बारामती कृषि उत्पन्न बाजार समितीच्या मुख्य यार्डात शनिवारी (दि.16) उघड लिलाव पद्धतीने कापूस खरेदी विक्रीचा शुभारंभ करण्यात आला आहे. बारामती मर्चन्ट असोसिएशनचे अध्यक्ष संभाजी किर्वे, उपाध्यक्ष निलेश भिंगे आणि शेतकरी सत्यवान चोरमले यांच्या हस्ते या लिलावाचा शुभारंभ पार पडला. पहिल्या दिवशी कापसाची 33 क्विंटलची आवक होऊन 7,001 रुपये एवढा प्रति क्विंटल उंच्चाकी दर मिळाला आहे. तर यावेळी कापसाचा 6 हजार 901 प्रति क्विंटल इतका सरासरी दर निघाला आहे.



त्यावेळी कल्पेश सोनवणे यांच्या आडतीवर काका चोरमले यांना 6 हजार 901 रुपये आणि सत्यवान चोरमले यांना 7 हजार 001 असा दर मिळाला आहे. याप्रसंगी किरण सोनवणे, के. बा. मचाले, अशोक बळगट, शिवाजी फाळके यांच्या आडतीवर कापसाची आवक झाली. तसेच खरेदीदार म्हणुन संभाजी किर्वे, निलेश भिंगे, महावीर वडुजकर यांनी यामध्ये सहभाग घेतला. यापुढे कापसाचे लिलाव दर बुधवार व शनिवार या दिवशी सकाळी 11.30 वाजता सुरू होणार आहेत. या पार्श्वभूमीवर, शेतकऱ्यांनी आपला कापूस स्वच्छ व निवडून आणावा. त्यामुळे आणखी चांगला दर मिळेल. कापूस हे नगदी पिक असून हमखास उत्पन्न देणारे आहे. बारामती तालुक्यातून कापसाची आवक झाली असून शेतकऱ्यांना लिलावाचे नंतर लगेच पेमेंट दिले जाते, अशी माहिती बाजार समितीचे सचिव अरविंद जगताप यांनी दिली आहे.



या कार्यक्रमावेळी शेतकरी, खरेदीदार, आडते व इतर मान्यवरांचे बारामती कृषि उत्पन्न बाजार समितीच्या वतीने स्वागत करण्यात आले. याप्रसंगी, बारामती बाजार समितीचे सदस्य सतिश जगताप, बापुराव कोकरे, संतोष आटोळे, मिलींद सालपे, हमाल संघटनेचे अध्यक्ष शंकर सरक व व्यापारी भगवान सातव, प्रशांत शहा, केशवराव मचाले, शिवाजी फाळके, महावीर वडुजकर, वर्धमान शहा उपस्थित होते. कार्यक्रमानंतर बारामती बाजार समितीचे सचिव अरविंद जगताप यांनी सर्वांचे आभार मानले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *