बारामती, 29 जुलैः बारामती तालुका पोलीस स्टेशन हद्दीत एमआयडीसी परिसरात अनेक मोठ्या औद्योगिक कंपन्या आहेत. बारामती तालुका पोलिसांनी एमआयडीसी परिसरात होणाऱ्या चोऱ्यांना नुकताच आळा घातला आहे. एमआयडीसी परिसरात एक व्यक्ती आज, 29 जुलै 2022 रोजी दोन गावठी बनावटी पिस्टल, एक रिवाल्वर आणि जिवंत काडतुस विक्रीसाठी घेऊन आला आहे, अशी गोपनीय माहिती बारामती तालुका पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक महेश ढवाण यांना मिळाली. पोलीस निरीक्षक ढवाण यांनी तात्काळ हद्दीमध्ये पेट्रोलिंग करीत असलेल्या तपास पथकाचे पोलीस अंमलदार राम कानगुडे, पोलीस नाईक अमोल नरुटे, पोलीस कॉन्स्टेबल दत्ता मदने यांना सदर व्यक्तीस पकडून खात्री करून कायदेशीर कारवाई करण्यास सांगितले.
तपास पथक सदर इसमास पकडण्यासाठी गेले. मात्र पोलिसांची चाहूल लागल्याने तो व्यक्ती सैरावैरा पळू लागला. त्यास मोठ्या शिताफीने तपास पथकाने ताब्यात घेऊन त्याची झडती घेतली. त्याच्याकडून दोन गावठी बनावटीचे पिस्टल, एक रिवाल्वर आणि तीन जिवंत काडतुस मिळाले. सदर व्यक्ती हा विनापरवाना हत्यारे जवळ बाळगून विक्री करणार होता. त्याच्याकडे अग्निशस्त्र व जिवंत काडतुस आहेत, हे माहीत असताना देखील मोठ्या शिताफिने व बेडरपणे त्यास ताब्यात घेऊन तालुका पोलिसांनी आणखी एक दमदार कामगिरी केली आहे. अमित तानाजी शेंडगे (वय 20 वर्ष मूळ रा. उस्मानाबाद, सध्या रा. रुई, बारामती) असे संशयित आरोपीचे नाव आहे. सदर संशयित आरोपीवर बारामती तालुका पोलीस स्टेशन आणि बारामती शहर पोलीस स्टेशन येथे भा.दं.वि. कलम 394, 379 प्रमाणे एकूण आठ गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.
सदरची कामगिरी पुणे ग्रामीणचे पोलीस अधीक्षक अभिनव देशमुख, पुणे ग्रामीण बारामती विभागचे अप्पर पोलीस अधीक्षक मिलिंद मोहिते, बारामती विभागचे उपविभागीय पोलिस अधिकारी गणेश इंगळे यांच्या मार्गदर्शनाखाली बारामती तालुका पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक महेश ढवाण, पोलीस हवालदार राम कानगुडे, पोलीस नाईक अमोल नरुटे, सदाशिव बंडगर, पो. कॉ. दत्ता मदने यांनी केली आहे. सदर गुन्ह्यांचा बारामती तालुका पोलीस स्टेशनचे पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक लेंडवे हे करीत आहेत.