कोची, 22 डिसेंबर: (विश्वजीत खाटमोडे) राष्ट्रीय तपास संस्थेने (एनआयए) मानवी तस्करी प्रकरणी आणखी एका परदेशी नागरिकाला केरळमधून अटक केली आहे. सौदी झाकीर असे त्याचे नाव आहे. मानवी तस्करी प्रकरणातील ही 11 वी अटक आहे. या प्रकरणाचा एनआयए ने महिन्यात देशभरात छापे टाकून पर्दाफाश केला होता. तत्पूर्वी गेल्या महिन्यात एनआयए ने सौदी झाकीरच्या घराची झडती घेतली होती. तेव्हापासून तो फरार झाला होता. याबाबतची माहिती एनआयए ने दिली आहे.
https://x.com/NIA_India/status/1738127136136081730?s=20
कोची येथून अटक केली होती
आरोपी सौदी झाकीर हा केरळमधील कोची तेथे लपून बसल्याची माहिती एनआयए ला मिळाली. त्यानूसार, त्यांनी तो लपलेल्या ठिकाणाचा शोध घेऊन त्यांनी त्याला अटक केली. आरोपी सौदी झाकीर हा भारत-बांगलादेश सीमेवरील बेनापोल मार्गे बेकायदेशीरपणे भारतात आल्याचे त्यांच्या तपासात समोर आले होते. त्यानंतर तो कर्नाटकातील बेंगळुरू शहरातील बेलंदूर भागात गेला होता. तेथे सौदी झाकीरने कचरा संकलन आणि पृथक्करण युनिट स्थापन केले होते. या युनिटमध्ये त्याने सीमेवरून बेकायदेशीरपणे भारतात प्रवेश केलेल्या परदेशी नागरिकांना कामावर ठेवले होते, असे एनआयएने प्रसिद्ध केलेल्या निवेदनात म्हटले आहे.
तत्पूर्वी, कर्नाटकातील काही लोक आसाम, त्रिपुरा आणि सीमापार देशांमधील सूत्रधार आणि तस्करांशी संबंध असल्याची माहिती एनआयए ला मिळाली होती. त्यानंतर 7 नोव्हेंबर रोजी मानवी तस्करीचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. तर हे आरोपी सीमेपलीकडून तस्करी करणाऱ्या व्यक्तींना बनावट आधार कार्डही देत होते, अशी धक्कादायक माहिती देखील एनआयए च्या तपासात उघडकीस आली आहे.
यापूर्वी 10 परदेशी लोकांना अटक झालेली
या प्रकरणात एनआयए ने यापूर्वी 10 परदेशी नागरिकांना अटक केली होती. त्यांच्या विरोधात कलम 120बी, 370, 465 आणि 471 आयपीसी आणि यूए (पी) कायदा, 1967 च्या कलम 18 नुसार गुन्ह्यांची नोंद करण्यात आली होती. भारत-बांगलादेश सीमेवर कार्यरत असलेल्या विविध नेटवर्कद्वारे चालवल्या जाणार्या मानवी तस्करी रॅकेटचा पर्दाफाश करण्याच्या हेतूने एनआयए या प्रकरणाचा तपास सुरू ठेवत असल्याची माहिती एनआयए ने दिली आहे.