पुणे, 11 ऑक्टोंबर: (विश्वजीत खाटमोडे) पुण्यातील बोपदेव घाट सामूहिक बलात्कार प्रकरणातील एका आरोपीला पोलिसांनी अटक केली. याची माहिती पुणे शहर पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी शुक्रवारी (दि.11) दिली आहे. पुण्यातील बोपदेव घाटात एका 21 वर्षीय तरूणीवर तीन जणांनी सामूहिक बलात्कार केला होता. शुक्रवार, दि. 04 ऑक्टोंबर रोजी ही घटना घडली होती. या घटनेनंतर हे तीन आरोपी फरार झाले होते. त्यातील एका आरोपीला पोलिसांनी आठवड्यानंतर अटक केली आहे. त्याची आता पोलिसांकडून कसून चौकशी केली जात आहे. पुणे पोलिसांचे हे मोठे यश असल्याचे म्हटले जात आहे. दरम्यान, या प्रकरणातील उर्वरित दोन आरोपींचा सध्या पोलीस शोध घेत आहेत.
https://x.com/ANI/status/1844679203813568943?t=y9OP7Lr8ZaTnnrBiimswlQ&s=19
अशी घडली होती घटना
गेल्या आठवड्यात पुण्यातील बोपदेव घाटात एका 21 वर्षीय तरूणीवर तीन नराधमांनी सामूहिक बलात्कार केला होता. घटनेने राज्यभरात एकच खळबळ उडाली होती. बोपदेव घाट परिसरात ही पीडित तरूणी आपल्या एका मित्रासोबत फिरायला गेली होती. यावेळी हे तिघे आरोपी त्यांच्याजवळ आले आणि त्यांनी या दोघांना मारहाण करण्यास सुरूवात केली. या आरोपींनी तरूणीच्या मित्राला बांधून ठेवले. त्यानंतर या नराधमांनी सदर तरूणीवर सामूहिक बलात्कार केला. रात्री अकरा वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली. त्यानंतर या तिन्ही नराधमांनी घटनास्थळावरून पळ काढला.
आरोपींच्या शोधासाठी 10 पथके
या घटनेची माहिती पोलिसांना पहाटे पाच वाजता मिळाली. त्यानंतर पोलिसांनी गुन्ह्याची नोंद करून याप्रकरणाचा तपास सुरू केला. यावेळी पोलिसांनी आरोपींचा शोध घेण्यासाठी गुन्हे शाखा आणि तपास शाखेच्या दहा पथकांची नेमणूक करण्यात आली. तसेच पोलीस पथक आणि श्वान पथकाने घटनास्थळी जाऊन या घटनेचा तपास केला होता. त्यानंतर पोलिसांनी याप्रकरणात आज एका आरोपीला अटक केली आहे. त्यामुळे त्याच्याकडून आता इतर दोन आरोपींची माहिती मिळवण्याचा पोलिसांचा प्रयत्न असणार आहे.