मुंबई, 01 मे: (विश्वजीत खाटमोडे) महाराष्ट्र राज्याचा आज 65 वा स्थापना दिवस आहे. त्यानिमित्त राज्यभरात आज विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. त्यामुळे राज्यात सध्या उत्साहाचे आणि आनंदाचे वातावरण आहे. महाराष्ट्र दिनानिमित्त देशाच्या राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी राज्यातील जनतेला महाराष्ट्र दिनाच्या मराठीतून शुभेच्छा दिल्या आहेत. त्यासंदर्भात पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि द्रौपदी मुर्मू यांनी सोशल मीडियावर पोस्ट केली आहे.
https://twitter.com/rashtrapatibhvn/status/1785498894006353937?s=19
राष्ट्रपतींच्या शुभेच्छा!
“महाराष्ट्र राज्याच्या स्थापनादिनिमित्त सर्व देशवासीयांना आणि विशेष करुन महाराष्ट्र राज्याच्या रहिवाशांना माझ्या हार्दिक शुभेच्छा. छत्रपती शिवाजी महाराजांची जन्मभूमी आणि कर्मभूमी असलेल्या या धरतीने महात्मा ज्योतिबा फुले, सावित्रीबाई फुले, ताराबाई शिंदे आणि बाबासाहेब आंबेडकर यांच्यासारख्या महान विभूती देशाला दिल्या आहेत. देशाच्या निरंतर प्रगतीमध्ये मराठी माणसांचे अमूल्य योगदान राहिले आहेत. महाराष्ट्राचे रहिवासी हे देशाच्या विकास यात्रेमध्ये नवे आदर्श प्रस्थापित करत राहोत, अशी माझी मंगल कामना आहे. राज्याच्या नागरिकांच्या उज्वल भविष्यासाठी माझ्या हार्दिक शुभेच्छा,” असे ट्विट राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी केले आहे.
https://twitter.com/narendramodi/status/1785507477104271444?s=19
मोदींनी शुभेच्छा देताना काय म्हटले?
तसेच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी त्यांच्या ट्विटमध्ये म्हटले की, “महाराष्ट्र दिन म्हणजे या भूमीचा वैभवशाली वारसा आणि अदम्य भावना यांचा गौरव करण्याचा दिवस आहे ज्या भूमीने महान दूरदर्शी घडवले आहेत आणि हा दिवस या राज्याच्या सांस्कृतिक समृद्धीशी संबंधित आहे. परंपरा, प्रगती आणि एकता यांच्या उत्तुंग दीपस्तंभाप्रमाणे महाराष्ट्र उभा आहे. महाराष्ट्राच्या प्रगतीसाठी काम करत राहण्याच्या आमच्या बांधिलकीचा आम्ही देखील पुनरुच्चार करत आहोत. महाराष्ट्राच्या जनतेला माझ्या हार्दिक शुभेच्छा.”