क्रांतीसुर्य महात्मा ज्योतिबा फुले यांच्या जयंतीनिमित्त पुण्यात 10 हजार किलोंची विक्रमी मिसळ!

पुणे, 11 एप्रिल: (विश्वजीत खाटमोडे) महाराष्ट्रात स्त्री शिक्षणाची मुहूर्तमेढ रोवणारे, सत्यशोधक समाजाचे संस्थापक व थोर विचारवंत क्रांतीसुर्य महात्मा ज्योतिबा फुले यांची आज जयंती आहे. त्यानिमित्त पुण्यातील गंज पेठ येथील महात्मा ज्योतिबा फुले वाडा याठिकाणी आज भव्य एकता मिसळ आयोजित करण्यात आली आहे. या कार्यक्रमात तब्बल 10 हजार किलोंची विक्रमी मिसळ बनवण्यात आली आहे. ही मिसळ आंतरराष्ट्रीय ख्यातीचे शेफ विष्णू मनोहर यांनी बनवली आहे. महात्मा ज्योतिबा फुले यांना अभिवादन करण्यासाठी फुले वाडा येथे येणाऱ्या नागरिकांना या मिसळीचे वाटप करण्यात येत आहे. नागरिकांना सकाळी 7 वाजल्यापासून ते दुपारी 4 वाजेपर्यंत या मिसळचा आस्वाद घेता येणार आहे. तरी ही मिसळ विनामूल्य असून त्याचा जास्तीत जास्त नागरिकांनी स्वाद घ्यावा, असे आवाहन आयोजकांनी केले आहे. सध्या याठिकाणी अनेक राजकीय नेते आणि नागरिक या मिसळचा आस्वाद घेताना दिसत आहेत.

या उपक्रमाचे हे सलग दुसरे वर्ष

क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिबा फुले व भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती समिती आणि लोकसहभागातून या उपक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. या उपक्रमाचे हे सलग दुसरे वर्ष आहे. गेल्या वर्षी देखील याठिकाणी शेफ विष्णू मनोहर यांनी 5 हजार किलोंची मिसळ बनवली होती. तर यंदा याठिकाणी विक्रमी 10 हजार किलोंची मिसळ करण्यात आली आहे. तसेच येत्या 14 एप्रिल रोजी डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त पुणे जिल्हाधिकारी कार्यालय येथील डॉ बाबासाहेब आंबेडकर पुतळा याठिकाणी देखील अशाच प्रकारे मिसळ बनविण्यात येणार असल्याची माहिती आयोजकांनी दिली आहे.

अजित पवार आणि चंद्रकांत पाटलांनी घेतला मिसळचा आस्वाद!

ही मिसळ तब्बल 15 बाय 15 फूट आकाराच्या कडाईमध्ये बनविण्यात आली आहे. विशेष म्हणजे, याच कडाईत अयोध्येत हलवा तयार करण्यात आला होता. साधारणतः 1 लाख लोकांना ही मिसळ पुरेल, अशी माहिती विष्णू मनोहर यांनी यावेळी दिली. दरम्यान, महात्मा ज्योतिबा फुले यांच्या जयंतीनिमित्त महात्मा ज्योतिबा फुले वाडा येथे आज राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार आणि उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी महात्मा ज्योतिबा फुले आणि सावित्रीबाई फुले यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून त्यांना अभिवादन केले. त्यानंतर अजित पवार आणि चंद्रकांत पाटील या नेत्यांनी याठिकाणी शेफ विष्णू मनोहर यांनी बनवलेल्या मिसळचा आस्वाद घेतला. याप्रसंगी, महायुतीचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. पाहा फोटो

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *