मुंबई, 27 जुलैः (विश्वजीत खाटमोडे) राज्यातील शिधापत्रिका धारकांसाठी महत्त्वाची बातमी आहे. येत्या गणेशोत्सवानिमित्त राज्यातील शिधापत्रिकाधारकांना ‘आनंदाचा शिधा’ चे वाटप करण्यात येणार आहे. याचा लाभ राज्यातील दीड कोटींहून अधिक कुटुंबांना होणार आहे. या संदर्भातील निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. त्यानुसार, येत्या गौरी गणपती उत्सवानिमित्त 15 ऑगस्ट 2024 ते 15 सप्टेंबर 2024 या कालावधीत आनंदाचा शिधा चे वाटप करण्यात येणार आहे. लाभार्थी शिधापत्रिकाधारकांना 100 रुपयांच्या सवलतीत हा आनंदाचा शिधा मिळणार आहे. दरम्यान, राज्यात शिवसेना, भाजप आणि राष्ट्रवादीचे सरकार स्थापन झाल्यापासून राज्य सरकारकडून महत्त्वाच्या सणानिमित्त नागरिकांना आनंदाचा शिधा दिला जातो.
https://x.com/MahaDGIPR/status/1816879054072463595?s=19
या वस्तू मिळणार!
राज्यातील छत्रपती संभाजीनगर व अमरावती विभागातील सर्व जिल्हे, तसेच नागपूर विभागातील वर्धा या 14 शेतकरी आत्महत्याग्रस्त जिल्ह्यातील दारिद्रेषेवरील (एपीएल) केशरी शिधापत्रिकाधारक शेतकऱ्यांनाही हा शिधा दिला जाणार आहे. तसेच राज्यातील सार्वजनिक वितरण व्यवस्थेअंतर्गत अन्न योजना व प्राधान्य कुटूंब शिधापत्रिकाधारकांना हा ‘आनंदाचा शिधा’ मिळणार आहे. यामध्ये प्रत्येकी एक किलो रवा, चनाडाळ, साखर आणि एक लिटर सोयाबीन तेल या वस्तूंचा समावेश असणार आहे.
दीड कोटींहून अधिक कुटुंबांना लाभ
तर प्रती संच 100 रुपये इतक्या सवलतीच्या दरात हा आनंदाचा शिधा मिळणार आहे. राज्यातील 1 कोटी 70 लाख 82 हजार 86 शिधापत्रिकाधारकांना याचा फायदा होणार असल्याचे राज्य सरकारने म्हटले आहे. त्यासाठी राज्य सरकारने 562.51 कोटी रुपयांच्या खर्चाला मान्यता दिली आहे. तर या आनंदाचा शिधा चे वाटप ई-पॉस प्रणालीद्वारे करण्यात येणार असल्याची माहिती राज्य सरकारने दिली आहे.