जालना, 22 फेब्रुवारीः (विश्वजीत खाटमोडे) राज्य सरकारने 20 फेब्रुवारी रोजी विधिमंडळाच्या विशेष अधिवेशनात मराठा समाजाला शिक्षण आणि नोकरीत 10 टक्के आरक्षण देण्याचा निर्णय घेतला होता. त्यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी जरांगे पाटलांना आंदोलन मागे घेण्याचे आवाहन केले होते. मात्र, मनोज जरांगे पाटील हे कुणबी मराठ्यांच्या सगेसोयरे अधिसूचनेचे कायद्यात रूपांतर करण्याच्या मागणीवर ठाम आहेत. या पार्श्वभूमीवर, मनोज जरांगे पाटील यांनी 24 फेब्रुवारीपासून दररोज संपूर्ण राज्यात रास्ता रोको आंदोलन करण्यात येणार असल्याची घोषणा केली आहे. त्यामुळे राज्य सरकारच्या अडचणीत वाढ झाली आहे.
शांततेत आंदोलन करण्याचे आवाहन
या आंदोलनाचा दहावी-बारावीच्या परीक्षांवर परिणाम होणार नाही, याची काळजी घेण्याच्या सूचना मनोज जरांगे पाटील यांनी आंदोलकांना दिल्या आहेत. सोबतच हे रास्ता रोको आंदोलन शांततेत करायचे आणि जाळपोळ, दगडफेक यांसारख्या कोणत्याही हिंसक गोष्टी करायच्या नाहीत, अशा कडक सूचना जरांगे पाटलांनी मराठा आंदोलकांना दिल्या आहेत. तसेच येत्या 1 मार्चपासून जरांगे पाटील यांनी मराठा समाजातील जेष्ठ नागरिक उपोषणाला बसणार असल्याची देखील माहिती दिली. त्यांना काही झाले तर त्याची जबाबदारी सरकारची असेल, असा इशारा त्यांनी दिला आहे.
असे असणार आंदोलन!
याशिवाय, 3 मार्च रोजी संपूर्ण राज्यात प्रत्येक जिल्ह्याच्या एकाच ठिकाणी रास्ता रोको करण्याची घोषणा देखील मनोज जरांगे पाटील यांनी केली आहे. यासंदर्भातील निर्णय मराठा समाजाच्या बैठकीत घेण्यात आला आहे. दरम्यान, जरांगे पाटील यांनी 24 फेब्रुवारीपासून संपूर्ण राज्यभरात करण्यात येणाऱ्या रास्ता रोको आंदोलनाची वेळ सांगितली आहे. आंदोलकांनी 24 फेब्रुवारीपासून प्रत्येक गावांत दररोज सकाळी 10:30 ते 1 वाजेपर्यंत रास्ता रोको करावा. त्यानंतर सायंकाळी 4 ते 7 वाजेपर्यंत पुन्हा एकदा रास्ता रोको आंदोलन करायचे, असे मनोज जरांगे पाटील यांनी म्हटले आहे.