पुणे, 17 फेब्रुवारी: (विश्वजीत खाटमोडे) पुणे शहरातील डेक्कन पोलीस ठाण्याच्या हद्दीत एका वयोवृद्ध महिलेची जबरदस्तीने सोनसाखळी हिसकावण्याची घटना घडली आहे. याप्रकरणी पोलिसांनी तात्काळ कारवाई करत आरोपीला चार तासांत अटक केली आहे. अक्षय अनिरुद्ध ओक (वय-24, रा. शनिवार पेठ, पुणे) असे अटक करण्यात आलेले आरोपीचे नाव आहे. याची माहिती पुणे शहर पोलिसांनी दिली आहे.
अशी घडली घटना
15 फेब्रुवारी 2025 रोजी ही घटना घडली. डेक्कन पोलीस ठाणे हद्दीत धुणी-भांडीचे काम करणाऱ्या एका वृद्ध महिलेस आरोपीने लिफ्ट देण्याच्या बहाण्याने नदीपात्राजवळील वीटभट्टीकडे नेले. तेथे तिला त्याने मारहाण करण्याची धमकी देऊन आणि जबरदस्तीने तिच्या गळ्यातील सोनसाखळी हिसकावून नेली. या प्रकरणी संबंधित महिलेने डेक्कन पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. त्यानुसार, या आरोपीच्या विरोधात डेक्कन पोलीस ठाण्यात भारतीय न्याय संहिता कलम अंतर्गत 392 (4) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला.
पोलिसांची जलद कारवाई
याप्रकरणी गुन्हा नोंद होताच वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली तपास पथकाने घटनास्थळाचा तपास करून सीसीटीव्ही फुटेज व तांत्रिक विश्लेषणाच्या माध्यमातून तसेच गोपनीय बातमीदारांच्या माहितीच्या आधारे संशयित आरोपीचा शोध घेतला. तपासादरम्यान आरोपी अक्षय ओक याचा माग काढण्यात आला. मिळालेल्या माहितीनुसार, पोलिसांनी त्याला शनिवार पेठेत ताब्यात घेतले. चौकशीदरम्यान त्याने आपले नाव अक्षय अनिरुद्ध ओक असे सांगितले.
चोरलेला मुद्देमाल जप्त
यावेळी पोलिसांनी आरोपीकडून चोरीस गेलेली 1 लाख रुपये किमतीची सोनसाखळी आणि 20 हजार रुपये किमतीची दुचाकी असा एकूण 1 लाख 20 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक अजय भोसले करत आहेत.
सदर कारवाई पश्चिम प्रादेशिक विभागाचे अपर पोलीस आयुक्त प्रविणकुमार पाटील, परिमंडळ 1 पोलीस उपायुक्त संदिपसिंह गिल्ल, विश्रामबाग विभागाचे सहायक पोलीस आयुक्त साईनाथ ठोंबरे, डेक्कन पोलीस ठाण्याच्या वरिष्ठ पोलीस निरीक्षक गिरीषा निंबाळकर आणि गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक प्रसाद राऊत यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली. तर या कारवाईत पोलीस उपनिरीक्षक अजय भोसले, दत्तात्रय सावंत, सहायक पोलीस फौजदार दत्तात्रय शिंदे, महिला पोलीस अंमलदार धनश्री सुपेकर, पोलीस अंमलदार महेश शिरसाठ, सागर घाडगे, वसीम सिद्दीकी, रोहित पाथरुट, रोहित मिरजे, नागनाथ म्हस्के आदींनी महत्त्वाची भूमिका बजावली.