मुंबई, 11 जानेवारी: (विश्वजीत खाटमोडे) मकर संक्रांतीचा सण जवळ येत आहे. मकर संक्रांतीचा सण महाराष्ट्रासह देशभरात मोठ्या थाटामाटात साजरा केला जातो. मकर संक्रांत हा सण तीळगुळासह पतंगांचा सण म्हणून देखील साजरा केला जातो. या दिवशी लोक मोठ्या पतंग उडवताना दिसतात. यामध्ये बहुतांश लोक पतंग उडवण्यासाठी नायलॉनच्या मांजाचा वापर करत असल्याचे निदर्शनास आले आहे. राज्यात अनेक ठिकाणी नायलॉन मांजाच्या वापरामुळे अनेकांना दुखापत झाल्याच्या घटना घडल्याचे आढळून आले आहे. त्यामुळे लोकांना आपला जीव देखील गमवावा लागला आहे. या पार्श्वभूमीवर, विधानपरिषदेच्या उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांनी अधिकाऱ्यांसोबत बैठक घेतली.
https://x.com/neelamgorhe/status/1877749078605656506?t=oJIUaIKU8bRx4pJkh1Kt5g&s=19
नायलॉन मांजाचा वापर रोखण्यासाठी बैठक
नीलम गोऱ्हे यांनी यावेळी मुंबई, ठाणे, नाशिक, जळगाव, धुळे, पुणे आणि छत्रपती संभाजीनगर महानगरपालिका क्षेत्रांमध्ये नायलॉन मांजाच्या वापरावरील प्रतिबंधात्मक कारवाई करण्याबाबत व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे बैठक घेतली. या बैठकीला पर्यावरण विभागाचे अधिकारी, मुंबई महानगरपालिकेचे आयुक्त आणि विविध शहरांतील पोलीस अधिकारी उपस्थित होते. नायलॉन मांजामुळे राज्यातील विविध भागांमध्ये नागरिक जखमी होण्याच्या घटना वाढल्या असून, काही प्रकरणांमध्ये जीवितहानीसुद्धा झाली आहे. अशा घटना टाळण्यासाठी नायलॉन मांजाच्या उत्पादनावर बंदी आणून त्याच्या विक्रीवर सक्त कारवाई करण्यात यावी. तसेच जनजागृती मोहीम राबविण्यात यावी, अशा सूचना विधानपरिषदेच्या उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांनी दिल्या.
जनजागृती आणि उपाययोजना:
नायलॉन मांजाच्या वापरावर बंदी घालण्यासाठी जनजागृती करणे आवश्यक आहे. गर्दीच्या ठिकाणी लाऊड स्पीकर, पोस्टर्स आणि इतर माध्यमांचा वापर करून नागरिकांपर्यंत माहिती पोहोचवावी. मात्र, यामुळे नागरिकांचा उत्साह कमी होणार नाही याची दक्षता घ्यावी, अशा सूचना यावेळी नीलम गोऱ्हे यांनी सबंधित अधिकाऱ्यांना दिल्या. तसेच संभाजीनगर पोलीस आयुक्तांनी राबविलेल्या चांगल्या संकल्पना इतर महापालिका आणि पोलीस आयुक्तांनीही अवलंब कराव्यात. दुचाकीस्वारांनी दुचाकीला ‘यू कमान’ लावल्याची तपासणी करावी. मांजा विक्री, उत्पादन किंवा मांजामुळे घडणाऱ्या घटनांविषयी माहिती देण्यासाठी टोल फ्री क्रमांक जारी करण्याची गरज आहे.
वाहतूक पोलीस आणि आपत्कालीन सेवा:
वाहतूक पोलिसांनी नायलॉन मांजावरील कारवाईसाठी सतर्क राहण्याचे निर्देश नीलम गोऱ्हे यांनी दिले आहेत. तसेच रस्त्यांवर आपत्कालीन पथकांची नेमणूक करून अपघात झाल्यास तातडीने वैद्यकीय मदत पुरवण्याची व्यवस्था करावी, असेही त्यांनी सांगितले. या बैठकीदरम्यान उपस्थित अधिकाऱ्यांनी आतापर्यंत करण्यात आलेल्या कारवाई आणि प्रतिबंधात्मक उपाययोजनांची माहिती दिली. नायलॉन मांजामुळे होणाऱ्या घटनांना आळा घालण्यासाठी सर्व संबंधित यंत्रणांनी एकत्रितपणे काम करण्याचे आवाहन यावेळी करण्यात आले.