मुंबई, 14 जानेवारी: (विश्वजीत खाटमोडे) मुंबईत नायलॉन किंवा सिंथेटिक पदार्थांपासून बनवलेल्या मांजाच्या वापरावर कडक बंदी घालण्याचा निर्णय मुंबई पोलिसांनी घेतला आहे. नायलॉन मांज्यामुळे दरवर्षी संक्रांतीच्या काळात नागरिकांना अनेक अपघातांचा सामना करावा लागतो. या मांज्यामुळे होणाऱ्या गंभीर जखमांच्या घटनांमध्ये वाढ झाली आहे. विशेषत: यामुळे दुचाकीस्वार आणि पादचाऱ्यांना गंभीर इजा होण्याचा धोका निर्माण होतो. तसेच नायलॉन मांजामुळे पक्षांची मोठ्या प्रमाणात जीवितहानी होत असल्याचे दिसून येते.
https://x.com/MumbaiPolice/status/1879005743757906224?t=R_YTBQrKS_h5mtldkUYcXQ&s=19
मुंबई पोलिसांचा कारवाईचा इशारा
या पार्श्वभूमीवर, मुंबई पोलिसांनी राज्य सरकारच्या आदेशानुसार नायलॉन मांजाच्या वापर, विक्री आणि साठवणीवर तात्काळ बंदी घालण्याचे निर्देश दिले आहेत. या आदेशाचे उल्लंघन करणाऱ्या कोणत्याही व्यक्तीवर बीएनएस च्या कलम 223 नुसार कठोर कारवाई केली जाईल, असा इशारा मुंबई पोलिसांनी दिला आहे. याबाबत पोलीस विभागाने विक्रेते, दुकानदार आणि सामान्य नागरिकांना या आदेशाचे काटेकोर पालन करण्याचे आवाहन केले आहे. तसेच अशा मांज्याच्या वापर करणाऱ्यांची माहिती कळवण्याचे आवाहनही पोलिसांनी केले आहे. त्यामुळे नागरिकांनी त्यांच्या आणि इतरांच्या सुरक्षेसाठी या नियमांचे पालन करणे आवश्यक आहे.
नायलॉन मांजा धोकादायक
नायलॉन मांजा अत्यंत धारदार आणि तंतूशीर असतो, ज्यामुळे तो सामान्य मांज्यापेक्षा खूप अधिक धोकादायक ठरतो. धक्कादायक बाब म्हणजे, संक्रांतीसारख्या सणाच्या काळात हा नायलॉन मांजामुळे नागरिकांना गंभीर अपघातांना सामोरे जाऊ लागू शकते. विशेषत: दुचाकीस्वार आणि पादचाऱ्यांना या मांज्यामुळे गळ्याला दुखापत होणे किंवा शरीरावर गंभीर इजा होणे अशा घटनांमध्ये वाढ झाली आहे. त्यामुळे नागरिकांनी काळजी घेण्याची आवश्यकता आहे. तसेच नायलॉन मांजामुळे मोठ्या प्रमाणात पक्ष्यांना देखील गंभीर इजा होत असल्याचे पाहायला मिळत आहे. दरम्यान, नायलॉन मांजावर बंदी असूनही अशा प्रकारचा मांजा कोठून येतो? असा प्रश्न निर्माण होत आहे. यासंदर्भात कडक कारवाई करण्याची मागणी नागरिकांकडून केली जात आहे.