बारामतीतील सार्वजनिक बांधकाम उपविभागाच्या कार्यालयात माहितीचा अधिकार आणि सनदेचा फलक नाही, आरपीआय (आठवले) पक्षाने दिला आंदोलनाचा इशारा

बारामती, 28 ऑगस्ट: बारामती येथील तीन हत्ती चौकाचे सुशोभीकरण करण्याच्या नावाखाली विद्रूपीकरण करण्याचे पाप बारामतीतील ज्या सार्वजनिक बांधकाम उपविभाग कार्यालयाने केले, त्याच कार्यालयातील भोंगळ कारभार आता समोर येत आहे. नागरिकांचे जीवनमान उंचावण्याच्या दृष्टीने अतिशय महत्त्वाची भूमिका बजावणाऱ्या अशा बारामती सार्वजनिक बांधकाम उपविभागातील कार्यालयातच नागरिकांच्या “सनदेचा फलक” तसेच “माहितीचा अधिकार अधिनियम 2005 चे कलम 4 नुसार फलक” लावणे बंधनकारक असताना देखील सार्वजनिक बांधकाम उपविभागातील उपविभागीय अभियंता पाटील यांनी आजतागायत सदर दोन्ही फलक न लावता एक प्रकारे शासनाच्या नियमांची पायमल्ली केली आहे.



सदर दोन्ही फलकांमुळे नागरिकांना त्यांच्या हक्क आणि अधिकारांची जाणीव होऊन मस्तावलेल्या अधिकाऱ्यांवर अंकुश ठेवण्यास एक प्रकारे मदत होत असते. सदर फलक न लावण्याबाबत संबंधित अधिकाऱ्याला विचारले असता त्यांच्याकडून उडवाउडवीची उत्तरे देण्यात आली आहेत. तसेच बारामती सार्वजनिक बांधकाम उपविभाग कार्यालयात सदर दोन्ही फलक तत्काळ लावला नाही तर, येणाऱ्या काळात नागरिकांच्या हक्क आणि अधिकारांसाठी तीव्र स्वरूपाचे आंदोलन करणार असल्याचा इशारा रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आठवले) पक्षाने दिला आहे. याची माहिती आरपीआय (आठवले) पक्षाचे पुणे जिल्हा युवक कार्याध्यक्ष रविंद्र सोनवणे यांनी भारतीय नायकला दिली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *