दिल्ली, 29 डिसेंबर: (विश्वजीत खाटमोडे) भारतात सध्या कोरोनाच्या जेएन-1 या व्हेरिएंटचे रुग्ण वाढताना दिसत आहेत. या व्हेरिएंटमुळे देशात सगळीकडे चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे. या पार्श्वभूमीवर, केंद्रीय आरोग्य आणि कुटुंब कल्याण राज्यमंत्री डॉ भारती पवार यांनी महत्त्वाची माहिती दिली आहे. जेएन-1 संदर्भात काळजी करण्याची गरज नाही, परंतु सावधगिरी बाळगली पाहिजे, असे त्यांनी यावेळी म्हटले आहे.
https://twitter.com/ANI/status/1740278996934459505?s=19
“केंद्रीय आरोग्य मंत्री मनसुख मांडविया यांनी सर्व राज्यांच्या आरोग्य मंत्र्यांसोबत व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे बैठक घेतली. यावेळी त्यांनी सर्व राज्यांना पाळत ठेवण्याबरोबरच जीनोम सिक्वेन्सिंग तपासणीची संख्या वाढवण्यास सांगितले आहे. सर्व राज्यांमध्ये आधीच कोरोनाबाबतच्या मार्गदर्शक सूचना आहेत. या सूचनांचे पालन करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.” अशी माहिती डॉ भारती पवार यांनी दिली आहे.
“सध्या सुट्ट्यांचे दिवस सुरू आहेत. त्यामुळे नागरिकांनी काळजी घेण्याची आवश्यकता आहे. मात्र त्यांनी घाबरून जाऊ नये. जेएन-1 हा एक सबव्हेरिएंट आहे. त्यामुळे काळजी करण्याचे काही कारण नाही. परंतू, नागरिकांनी यासंदर्भात थोडीशी सावधगिरी बाळगावी. आजारी रुग्ण, ज्येष्ठ नागरिक आहेत त्यांनी थोडी काळजी घ्यायला हवी. आपण याच्या आधी देखील कोरोनाच्या परिस्थितीला सामोरे गेलेलो आहोत. त्यामुळे कोरोना संदर्भातील सूचनांचे कशा प्रकारे पालन करायचे आहे? ते सर्वांना माहिती आहे. तसेच ज्या राज्यात सध्या कोरोनाचा प्रसार मोठ्या प्रमाणात होत आहे, अशा राज्यांना सतर्क राहण्याच्या सूचना दिल्या आहेत. असे आरोग्य राज्यमंत्री डॉ भारती पवार यांनी म्हटले आहे.