पारनेर, 29 मार्च: (विश्वजीत खाटमोडे) लोकसभा निवडणुकीच्या आधी अजित पवार यांना मोठा धक्का बसला आहे. निलेश लंके यांनी आमदारकीचा राजीनामा दिला आहे. यासंदर्भात निलेश लंके यांनी विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांना राजीनाम्याचे पत्र पाठवले आहे. या पत्रात त्यांनी आपण पारनेरच्या आमदारकीचा राजीनामा देत असल्याचे म्हटले आहे. याची माहिती निलेश लंके यांनी कार्यकर्ता संवाद मेळाव्यात दिली आहे. त्यामुळे निलेश लंके हे आता राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षात प्रवेश करणार असल्याच्या चर्चा राजकीय वर्तुळात सुरू झाल्या आहेत.
दक्षिण नगरमधून उमेदवारी मिळणार?
निलेश लंके यांनी आता आमदारकीचा राजीनामा दिल्यानंतर त्यांना राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाकडून दक्षिण अहमदनगर मतदार संघातून लोकसभेची उमेदवारी मिळण्याची शक्यता आहे. त्यामुळे येत्या लोकसभा निवडणुकीत दक्षिण नगरमधून भाजप उमेदवार सुजय विखे पाटील विरुद्ध निलेश लंके असा सामना होण्याची दाट शक्यता निर्माण झाली आहे. दरम्यान, निलेश लंके हे आगामी लोकसभा निवडणुकीत दक्षिण नगरमधून निवडणूक लढवण्यासाठी इच्छुक आहेत. मात्र, काही दिवसांपूर्वी भाजपने या मतदार संघात सुजय विखे पाटील यांना उमेदवारी जाहीर केली होती. त्यामुळे निलेश लंके यांना महायुतीकडून या जागेवर तिकीट मिळणार नसल्याचे स्पष्ट झाले होते.
सुजय विखे पाटील विरुद्ध निलेश लंके?
त्यानंतर निलेश लंके यांनी काही दिवसांपूर्वी शरद पवार यांची भेट घेतली होती. तेंव्हापासून निलेश लंके हे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षात प्रवेश करणार असल्याच्या चर्चा सुरू झाल्या होत्या. तर निलेश लंके यांच्या आमदारकीच्या राजीनाम्यामुळे या चर्चा आता खऱ्या ठरताना दिसत आहेत. त्यामुळे या लोकसभा निवडणुकीत दक्षिण नगर मतदार संघात सुजय विखे पाटील विरुद्ध निलेश लंके अशी लढत पाहायला मिळेल, अशी अपेक्षा व्यक्त करण्यात येत आहे. त्यामुळे ही निवडणूक सुजय विखे पाटील यांना सोपी जाणार नसल्याचे म्हटले जात आहे.