पंतप्रधान मोदींना नायजेरिया सर्वोच्च पुरस्काराने सन्मानित करणार

दिल्ली, 17 नोव्हेंबर: (विश्वजीत खाटमोडे) भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना नायजेरियाने त्यांच्या देशाचा सर्वोच्च पुरस्कार देण्याची घोषणा केली आहे. नायजेरिया देश पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना ‘ग्रँड कमांडर ऑफ द ऑर्डर ऑफ द नायजर’ (GCON) या पुरस्काराने सन्मानित करणार आहे. यापूर्वी राणी एलिझाबेथ यांना हा सन्मान मिळाला होता. राणी एलिझाबेथ यांना 1969 मध्ये द ग्रँड कमांडर ऑफ द ऑर्डर ऑफ द नायजर या पुरस्काराने सन्मानित करण्यात आले होते. दरम्यान, पंतप्रधान मोदींना कोणत्याही देशाने दिलेला हा 17 वा आंतरराष्ट्रीय पुरस्कार आहे. याबाबतचे वृत्त एएनआय वृत्तसंस्थेने दिले आहे.

https://x.com/AHindinews/status/1858034938626584983?t=UcUL8sTtlCy5NvY6AYntrw&s=19

पंतप्रधान मोदी तीन देशांच्या दौऱ्यावर

पंतप्रधान नरेंद्र मोदी हे सध्या नायजेरिया, ब्राझील आणि गयाना या तीन देशांच्या दौऱ्यावर आहेत. त्यांचा हा दौरा 16 ते 21 नोव्हेंबर या कालावधीत असणार आहे. यादरम्यान, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे आज (दि.17) मध्यरात्री नायजेरियाची राजधानी अबुजा येथे आगमन झाले. यावेळी येथे त्यांचे स्वागत करण्यात आले. पंतप्रधान त्यांच्या दौऱ्याच्या पहिल्या दिवशी नायजेरियात आहेत. त्यानंतर पंतप्रधान मोदी हे ब्राझीलमध्ये जी-20 नेत्यांच्या शिखर परिषदेला उपस्थित राहणार आहेत. त्यांच्या दौऱ्याच्या तिसऱ्या आणि शेवटच्या टप्प्यात पंतप्रधान मोदी हे गयाना राज्याच्या दौऱ्यावर जातील. 50 वर्षांहून अधिक काळातील भारतीय पंतप्रधानांची या देशाला पहिली भेट असणार आहे.

नरेंद्र मोदींना डॉमिनिका देशाचा सर्वोच्च राष्ट्रीय पुरस्कार

दरम्यान, दोनच दिवसांपूर्वी कॅरेबियन देश असलेल्या डॉमिनिका देशाने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना त्यांच्या देशाचा सर्वोच्च राष्ट्रीय पुरस्कार देण्याची घोषणा केली होती. कोरोनाच्या काळात पंतप्रधान मोदींनी डॉमिनिकाला कोविड-19 लसीचे 70 हजार डोस दिले होते. त्याबद्दल पंतप्रधान मोदींना या डॉमिनिका अवॉर्ड ऑफ ऑनर पुरस्काराने सन्मानित करण्यात येणार आहे. त्यांना हा पुरस्कार गयाना येथे 19 ते 21 नोव्हेंबर दरम्यान होणाऱ्या भारत-कॅरिकॉम समिटमध्ये देण्यात येणार आहे. यासंदर्भातील माहिती डोमिनिका पंतप्रधान कार्यालयाने प्रसिद्धी पत्रकाद्वारे दिली होती.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *