पाच राज्यांत NIA चे छापे; एका संशयिताला अटक

दिल्ली, 06 ऑक्टोंबर: (विश्वजीत खाटमोडे) राष्ट्रीय तपास संस्थेने (NIA) शनिवारी (दि.05) जैश-ए-मोहम्मद या दहशतवादी संघटनेच्या विरोधात मोठी कारवाई केली. त्यासाठी एनआयए ने देशभरातील जम्मू-काश्मीर, आसाम, महाराष्ट्र, उत्तर प्रदेश आणि दिल्ली या 5 राज्यातील 26 ठिकाणी छापे टाकले होते. या कारवाईत एका व्यक्तीला अटक करण्यात आली आहे. याची माहिती एनआयएने दिली आहे. शेख सुलतान सलाहुद्दीन अयुबी असे अटक केलेल्या व्यक्तीचे नाव आहे. त्याच्यावर देशाच्या विरोधात कट रचणे आणि दहशतवादी संघटना जैश-ए-मोहम्मदला निधी पुरवल्याचा तसेच तो दहशतवादी संघटनेत तरूणांची भरती करत असल्याचा आरोप आहे. त्याला आता नवी दिल्लीच्या पटियाला हाऊस येथील एनआयएच्या विशेष न्यायालयात हजर करण्यात येणार आहे.

https://x.com/NIA_India/status/1842569004583690266?t=tb7QVHrTFnl1AmFTqdMupw&s=19

अनेक महत्त्वाचे पुरावे जप्त

या छाप्यादरम्यान एनआयएच्या पथकांनी अत्यंत महत्त्वाचे पुरावे जप्त केली आहेत. यामध्ये दहशतवादाच्या सबंधित अनेक कागदपत्रे, इलेक्ट्रॉनिक उपकरणे, पॅम्प्लेट्स आणि मासिके जप्त करण्यात आली आहेत. याशिवाय इतर अनेक संशयितांनाही यावेळी चौकशीसाठी ताब्यात घेण्यात आले आहे. त्यांची सध्या कसून चौकशी केली जात आहे. जैश-ए-मोहम्मदशी संबंधित हे लोक देशातील तरूणांना कट्टरपंथी बनवण्यात गुंतले होते. तसेच ते दहशतवादाशी संबंधित प्रचार करीत होते. हे संशयित देशभरात हिंसक दहशतवादी हल्ले करण्यासाठी तरूणांना भडकावण्याचे काम करीत होते, असे एनआयएच्या तपासात समोर आले आहे.

या ठिकाणी छापेमारी

ही कारवाई करण्यासाठी एनआयएने 5 राज्यांतील 26 ठिकाणी छापे टाकले होते. यामध्ये महाराष्ट्रातील छत्रपती संभाजीनगर, जालना आणि मालेगाव, आसाम येथील गोलपारा, उत्तर प्रदेशातील मेरठ आणि सहारनपूर, दिल्ली, जम्मू-काश्मीरमधील बारामुल्ला, पुलवामा आणि रामबन येथील 26 ठिकाणी छापे टाकले. आता या प्रकरणाचा तपास सुरू असल्याचे एनआयएने म्हटले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *