येत्या गुरूवारी अजित पवार बारामती तालुक्याच्या दौऱ्यावर! सात ठिकाणी सभा घेणार

बारामती, 12 मार्च: (विश्वजीत खाटमोडे) राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार हे गुरूवारी (दि.14) बारामती तालुक्याच्या दौऱ्यावर येणार आहेत. या दौऱ्यात अजित पवार हे बारामती तालुक्यातील अनेक गावांना भेट देणार आहेत. दरम्यान, यंदाच्या लोकसभा निवडणुकीत बारामती मतदार संघात पवार विरुद्ध पवार असा संघर्ष पाहायला मिळण्याची दाट शक्यता आहे. तसेच गेल्या काही दिवसांपासून येत्या लोकसभा निवडणुकीत अजित पवार यांच्या पत्नी सुनेत्रा पवार यांना महायुतीकडून उमेदवारी मिळणार असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे. असे झाल्यास लोकसभा निवडणुकीत बारामती मतदार संघात सुप्रिया सुळे विरुद्ध सुनेत्रा पवार यांच्यात लढत पाहायला मिळणार आहे. अशा परिस्थितीत अजित पवार यांच्या बारामती तालुक्याच्या दौऱ्याला महत्त्व प्राप्त झाले आहे.

या ठिकाणी सभा घेणार!

या दौऱ्यात उपमुख्यमंत्री अजित पवार हे येत्या गुरूवारी बारामती तालुक्यातील 7 ठिकाणी सभा घेणार आहेत. या सभांच्या माध्यमातून अजित पवार हे गावागावांतील कार्यकर्त्यांशी संवाद साधणार आहेत. यामध्ये गुरूवारी सकाळी 8:30 वाजता बारामती तालुक्यातील सुपे येथील सुपे माऊली गार्डन याठिकाणी अजित पवार यांची दिवसातील पहिली जाहीर सभा होणार आहे. त्याचबरोबर सकाळी 10 वाजता बारामती तालुक्यातील करंजेपुल चौक येथे, दुपारी 11.30 वाजता कोहाळे बु।। ग्रामपंचायत समोर, दुपारी 2 वाजता बारामती तालुक्यातील माळेगाव बु।। येथील अमरसिंह कॉलनी, दुपारी 3:30 वाजता निरावागज ग्रामपंचायत समोर, सायंकाळी 5 वाजता, झारगडवाडी ग्रामपंचायतीसमोर आणि सायंकाळी 6:30 वाजता बारामतीमधील पेन्सिल चौकातील मुक्ताई लॉन्स येथे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या सभा होणार आहेत. त्यामुळे या सभांमध्ये अजित पवार हे कोणती नवी घोषणा करतात का? याकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *