बेंगळुरू, 20 ऑक्टोंबर: (विश्वजीत खाटमोडे) भारत आणि न्यूझीलंड यांच्यातील पहिला कसोटी सामना बेंगळुरू येथील एम. चिन्नास्वामी स्टेडियमवर खेळविण्यात आला. या सामन्यात न्यूझीलंडने भारतीय संघाचा 8 गडी राखून पराभव केला. यावेळी भारताने न्यूझीलंडसमोर विजयासाठी 107 धावांचे आव्हान ठेवले होते. न्यूझीलंडने हे लक्ष्य 2 गडी गमावून पूर्ण केले. त्याचबरोबर न्यूझीलंड संघाने 3 कसोटी सामन्यांच्या मालिकेत 1-0 अशी आघाडी घेतली आहे. न्यूझीलंडकडून दुसऱ्या डावात विल यंगने 48 धावा केल्या. तर रचिन रवींद्रने 39 धावांचे योगदान दिले. तर डेव्हॉन कॉनवेने 17 धावांची खेळी केली. न्यूझीलंडचा रचिन रवींद्र या सामन्याचा मानकरी ठरला. त्याने या सामन्याच्या पहिल्या डावात 134 धावा आणि दुसऱ्या डावात 39 धावा केल्या.
https://x.com/BCCI/status/1847896566398669041?t=WyOTc74DW0wsdwmgrgRaoQ&s=19
भारत पहिला डाव 46 धावा
तत्पूर्वी, या सामन्यात भारतीय संघाचा कर्णधार रोहित शर्माने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. परंतु त्यांचा हा निर्णय पूर्णपणे चुकीचा ठरला. या सामन्यात भारताचा पहिला डाव 46 धावांत संपुष्टात आला. त्यानंतर न्यूझीलंडच्या फलंदाजांनी शानदार कामगिरी करीत दुसऱ्या डावात 402 धावा केल्या. त्यामुळे पहिल्या डावात न्यूझीलंडला 356 धावांची मोठी आघाडी मिळाली. त्यानंतर दुसऱ्या डावात भारताच्या फलंदाजांनी चांगली कामगिरी केली. यामध्ये सरफराज खानने 150 धावांची खेळी केली. त्याने विराट कोहलीसोबत तिसऱ्या विकेटसाठी 136 धावांची भागीदारी आणि रिषभ पंतसोबत मिळून चौथ्या विकेटसाठी 211 चेंडूत 177 धावांची भागीदारी केली. त्यामुळे भारताला न्यूझीलंडची 356 धावांची आघाडी पार करता आली. या सामन्यात विराट कोहली 70 आणि रिषभ पंत याने 99 धावांची खेळी केली.
107 धावांचे लक्ष्य पार
परंतू, सरफराज खान आणि रिषभ पंत हे दोघे बाद झाल्यावर भारताचे इतर फलंदाज झटपट बाद झाले. दुसऱ्या डावात भारताने 462 धावा केल्या. त्यामुळे भारताने न्यूझीलंडसमोर 107 धावांचे सोपे लक्ष्य ठेवले.या लक्ष्याचा पाठलाग करताना न्यूझीलंडचा कर्णधार टॉम लॅथम डावाच्या पहिल्याच षटकात जसप्रीत बुमराहच्या गोलंदाजीवर बाद झाला. तो बाद झाल्यावर डेव्हन कॉनवे आणि विल यंग यांनी न्यूझीलंडकडून चांगली फलंदाजी केली. या दोघांनी दुसऱ्या विकेटसाठी 35 धावांची भागीदारी केली. त्यावेळी कॉनवेला जसप्रीत बुमराहने 17 धावांवर बाद केले. त्यानंतर विल यंग आणि रचिन रवींद्रने संघाचा डाव सावरला. त्याचबरोबर या दोघांनी 75 धावांची विजयी भागीदारी करीत न्यूझीलंडला या सामन्यात विजय मिळवून दिला. त्यावेळी विल यंगने नाबाद 48 धावा आणि रचिन रवींद्रने नाबाद 39 धावांची खेळी केली. दुसऱ्या डावात भारताकडून जसप्रीत बुमराहने 2 विकेट घेतल्या.
न्यूझीलंडचा 36 वर्षांनंतर भारतात विजय
या विजयासह न्यूझीलंडने 3 कसोटी सामन्यांच्या मालिकेत 1-0 अशी आघाडी घेतली आहे. या मालिकेतील दुसरा कसोटी सामना 24 ऑक्टोबरपासून पुण्यात खेळवला जाणार आहे. त्यामुळे या मालिकेतील आव्हान कायम राखण्यासाठी भारताला दुसऱ्या कसोटीत विजय मिळवणे आवश्यक आहे. दरम्यान, पहिल्या कसोटीतील विजयासोबतच न्यूझीलंड संघाने 36 वर्षांनंतर भारतीय भूमीवर कसोटी सामना जिंकण्याची ऐतिहासिक कामगिरी केली आहे. याआधी त्यांनी नोव्हेंबर 1988 मध्ये भारतीय संघाचा भारतात येऊन पराभव केला होता.