बंगळूरू, 9 नोव्हेंबरः (विश्वजीत खाटमोडे) एकदिवसीय क्रिकेट विश्वचषक स्पर्धेत आज श्रीलंका विरुद्ध न्यूझीलंड यांच्यात बंगळुरूच्या एम चिन्नास्वामी स्टेडियमवर सामना झाला. या सामन्यात न्यूझीलंडने श्रीलंकेचा 5 गडी राखून पराभव केला. त्यामुळे न्यूझीलंड उपांत्य फेरीत पोहोचण्यासाठी अगदी जवळच आला आहे. तत्पूर्वी या सामन्यात न्यूझीलंडने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. त्यावेळी श्रीलंकेने प्रथम फलंदाजी करताना 46.4 षटकांत सर्वबाद 171 धावा केल्या. न्यूझीलंडने त्यांचे हे आव्हान 23.1 षटकात 5 गड्यांच्या मोबदल्यात पूर्ण केले आणि हा सामना जिंकला. या सामन्यात न्यूझीलंडचा वेगवान गोलंदाज ट्रेंट बोल्ट हा सामनावीर ठरला. त्याने आज 3 विकेट घेतल्या.
एसटी कर्मचाऱ्यांना 6 हजारांचा दिवाळी बोनस जाहीर
या विजयामुळे न्यूझीलंडचे आता 10 गुण झाले आहेत. यासोबतच त्यांची धावगती उपांत्य फेरीच्या शर्यतीत असलेल्या पाकिस्तान आणि अफगाणिस्तान या संघांपेक्षा अधिक आहे. त्यामुळे आजचा विजय न्यूझीलंडसाठी महत्वाचा ठरला आहे. तर दुसरीकडे मात्र श्रीलंकेचे या स्पर्धेतील आव्हान संपुष्टात आले आहे.
तत्पूर्वी या सामन्यात प्रथम फलंदाजी करताना श्रीलंकेच्या संघाची खराब सुरूवात झाली. संघाच्या 3 धावा असताना त्यांची पहिली विकेट पडली. त्यांचा सलामीवीर पथुम निशांका खाते न उघडताच बाद झाला. त्यानंतर कुसल परेराने 28 चेंडूत 51 धावांची वेगवान खेळी केली. त्याने त्याच्या या खेळीत 9 चौकार आणि 2 षटकार लगावले. तो बाद झाल्यावर श्रीलंका संघाच्या ठराविक अंतराने विकेट पडत गेल्या. या सामन्यात श्रीलंकेतर्फे कुसल परेरा (51) वगळता, महिष तिक्षना 38, धनंजय डी सिल्वा 19 आणि अँजेलो मॅथ्यूज 16 आणि दिलशान मदुशंकाने 19 धावा केल्या. तर न्यूझीलंडकडून गोलंदाजीत ट्रेंट बोल्टने सर्वाधिक 3 विकेट, तर लॉकी फर्ग्युसन, मिचेल सँटनर, रचिन रवींद्र यांनी प्रत्येकी 2 विकेट घेतल्या.
राज्यातील प्रदूषण नियंत्रणासाठी मुख्यमंत्र्यांच्या सूचना
त्यानंतर 172 च्या लक्ष्याचा पाठलाग करण्यासाठी आलेल्या न्यूझीलंडच्या डावाची सुरूवात चांगली झाली. त्यांचे सलामीवीर डेव्हन कॉनवे आणि रचिन रवींद्र यांनी 82 धावांची भागीदारी केली. त्यावेळी कॉनवे हा 42 चेंडूत 45 धावा करून बाद झाला. त्यानंतर रचिन रवींद्र देखील लगेचच बाद झाला. त्याने 34 चेंडूत 42 धावा केल्या. मग कर्णधार केन विल्यम्सन 19 धावांवर बाद झाला. त्यानंतर आलेल्या डॅरिल मिशेलने 43 धावा करून आपल्या संघाला विजय मिळवून दिला. या सामन्यात श्रीलंकेतर्फे अँजेलो मॅथ्यूजने सर्वाधिक 2 विकेट घेतल्या. तर महिश तिक्षना आणि दुष्मंथा चमेरा यांनी प्रत्येकी 1 विकेट घेतली.
One Comment on “न्यूझीलंडचा श्रीलंकेवर विजय; न्यूझीलंड उपांत्य फेरीच्या शर्यतीत”