मुंबई, 22 एप्रिल: (विश्वजीत खाटमोडे) बॉलिवूड अभिनेता सलमान खान याच्या मुंबईतील गॅलेक्सी अपार्टमेंटच्या बाहेर मोटारसायकलवरून आलेल्या दोन हल्लेखोरांनी गोळीबार केला होता. 14 एप्रिल रोजी पहाटेच्या सुमारास ही घटना घडली होती. त्यानंतर पोलिसांनी या दोघांना गुजरातच्या कच्छ मधून अटक केली होती. विक्की गुप्ता (24) आणि सागर पाल (21) अशी अटक केलेल्यांची नावे आहेत. हे दोघेही बिहारचे रहिवासी आहेत. या दोघांना कोर्टाने 25 एप्रिलपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. चौकशीत या आरोपींनी गुन्हा केल्यानंतर ही बंदूक तापी नदीत फेकल्याचे गुन्हे शाखेला सांगितले होते. ही बंदूक शोधण्यासाठी मुंबई गुन्हे शाखेचे एक पथक आज सुरतला पोहोचले आहे. याची माहिती एएनआय वृत्तसंस्थेने दिली आहे.
https://twitter.com/ANI/status/1782278646813937773?s=19
पोलीस बंदुकीचा शोध घेणार
सलमान खानच्या घराबाहेरील गोळीबार प्रकरणी सध्या मुंबई पोलिसांचा तपास सुरू आहे. याप्रकरणाची अधिक माहिती गोळा करण्यासाठी आणि गोळीबारात वापरलेल्या बंदुकीचा शोध घेण्यासाठी मुंबई पोलिसांच्या गुन्हे शाखेचे पथक सुरतला गेले आहे. दरम्यान, सलमान खानच्या घरावर झालेल्या गोळीबार प्रकरणात पोलिसांनी या दोन आरोपींसह गँगस्टर लॉरेन्स बिश्नोई याचा भाऊ अनमोल बिश्नोई यालाही आरोपी बनवले आहे. तत्पूर्वी, सलमान खानच्या घराबाहेर झालेल्या गोळीबारानंतर अनमोल बिश्नोईने या हल्ल्याची जबाबदारी स्वीकारली होती. यासंदर्भात त्याने सोशल मीडियावर पोस्ट केली होती.
सलमानची कामाला सुरूवात
सलमान खानने या गोळीबाराच्या घटनेनंतर कामाला सुरूवात केली आहे. त्याच्याकडे सध्या अनेक प्रोजेक्ट्स आहेत. सलमान खान सध्या दुबईत असून, त्याच्या सुरक्षेत आणखी वाढ करण्यात आली आहे. तत्पूर्वी, हा गोळीबार झाल्यानंतर महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सलमान खानची त्याच्या मुंबईतील घरी जाऊन भेट घेतली होती. त्यावेळी एकनाथ शिंदे यांनी या घटनेचा तीव्र शब्दांत निषेध केला होता. तसेच त्यांनी सलमानला त्याच्या सुरक्षेची हमी दिली होती.