NEET-UG परीक्षा; ग्रेस मार्क्स मिळालेल्या 1563 विद्यार्थ्यांची आज पुन्हा परीक्षा

दिल्ली, 23 जून: (विश्वजीत खाटमोडे) NEET-UG 2024 परीक्षेत ग्रेस मार्क्स मिळालेल्या 1563 विद्यार्थ्यांची आज रविवारी पुन्हा परीक्षा होणार आहे. ही परीक्षा आज दुपारी 2 ते 5:20 या वेळेत होणार आहे. NEET-UG परीक्षेत कथित अनियमिततेच्या आरोपानंतर सुप्रीम कोर्टाने ग्रेस मार्क्स मिळालेल्या 1563 विद्यार्थ्यांची फेरपरीक्षा घेण्यास नॅशनल टेस्टिंग एजन्सी (एनटीए) ला सांगितले होते. त्यानुसार, केवळ ग्रेस मार्क्स मिळालेल्या विद्यार्थ्यांचीच आज परीक्षा होणार आहे. या पार्श्वभूमीवर, नॅशनल टेस्टिंग एजन्सीने काही दिवसांपूर्वीच 1563 विद्यार्थ्यांसाठी NEET UG फेरपरीक्षेचे हॉल तिकीट जारी केले आहे. विद्यार्थ्यांना हे हॉल तिकीट neet.ntaonline.in या वेबसाईटवरून डाऊनलोड करता येईल.

https://x.com/NTA_Exams/status/1801243545438990692?s=19

सहा शहरांत होणार परीक्षा

देशभरात 5 मे रोजी झालेल्या NEET UG परीक्षेत काही विद्यार्थ्यांना कमी वेळ मिळाल्यामुळे ग्रेस मार्क्सची सवलत देण्यात आली होती. मात्र यासंदर्भात विरोध वाढत गेल्यानंतर नॅशनल टेस्टिंग एजन्सीने या विद्यार्थ्यांचा निकाल रद्द करून त्यांची फेरपरीक्षा घेण्याचा निर्णय घेतला होता. देशभरातील 6 शहरांमध्ये आज ही परीक्षा होणार आहे. छत्तीसगडचे बालोद आणि दंतेवाडा, गुजरातचे सुरत, मेघालय आणि हरियाणामधील बहादुरगड आणि चंदीगड या शहरांमध्ये ही परीक्षा होत आहे. या परीक्षेचा निकाल 30 जूनपर्यंत जाहीर होणार आहे. NEET UG चा सुधारित निकाल जाहीर झाल्यानंतर 6 जुलैपासून समुपदेशन प्रक्रिया सुरू होईल, असे एनटीएकडून सांगण्यात आले आहे.

NEET-UG परिक्षेचा तपास CBI कडे

दरम्यान, NEET-UG परीक्षेतील कथित गैरप्रकाराचा तपास सीबीआयकडे सोपवण्यात आल्याची घोषणा केंद्र सरकारने केली आहे. NEET-UG 2024 परीक्षेतील कथित अनियमितता, फसवणूक, तोतयागिरी तसेच गैरप्रकारांची काही प्रकरणे नोंदवली गेली आहेत. भारत सरकारच्या शिक्षण मंत्रालयाने यासंदर्भातील आढावा घेतल्यानंतर हे प्रकरण सर्वसमावेशक तपासासाठी केंद्रीय अन्वेषण ब्युरो (CBI) कडे सोपवण्याचा निर्णय घेतला आहे. सार्वजनिक परीक्षांमधील गैरप्रकार रोखण्यासाठी आणि त्यांच्याशी संबंधित किंवा आनुषंगिक बाबींची तरतूद करण्यासाठी केंद्र सरकारने देशात नुकताच सार्वजनिक परीक्षा कायदा लागू केला आहे. परीक्षांचे पावित्र्य राखण्यासाठी आणि विद्यार्थ्यांच्या हिताचे रक्षण करण्यासाठी सरकार कटिबद्ध आहे. यात गुंतलेली कोणतीही व्यक्ती किंवा संस्था आढळल्यास कठोर कारवाईला सामोरे जावे लागेल, असा पुनरुच्चार शिक्षण मंत्रालयाने त्यांच्या निवेदनातून केला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *