दिल्ली, 23 जून: (विश्वजीत खाटमोडे) राष्ट्रीय परीक्षा मंडळाकडून घेण्यात येणारी NEET-PG प्रवेश परीक्षा पुढे ढकलण्यात आली आहे. ही परीक्षा रविवारी म्हणजेच 23 जून रोजी होणार होती. परंतु, परीक्षेच्या एक दिवस आधीच ही परीक्षा रद्द करण्यात आली आहे. या परीक्षेची नवीन तारीख लवकरच जाहीर केली जाईल, असे आरोग्य मंत्रालयाने सांगितले आहे. या संदर्भातील निवेदन आरोग्य मंत्रालयाने नुकतेच जारी केले आहे.
https://x.com/MoHFW_INDIA/status/1804555357928460325?s=19
आरोग्य मंत्र्यालयाचे निवेदन
नुकत्याच झालेल्या काही स्पर्धात्मक परीक्षांच्या अनियमितता बाबत आरोपांच्या अलीकडील घटना लक्षात घेता, आरोग्य मंत्रालयाने वैद्यकीय विद्यार्थ्यांसाठी राष्ट्रीय परीक्षा मंडळाने घेतलेल्या NEET-PG प्रवेश परीक्षेच्या प्रक्रियेचे सखोल मूल्यांकन करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यानुसार, खबरदारीचा उपाय म्हणून रविवारी, 23 जून 2024 रोजी होणारी NEET-PG प्रवेश परीक्षा पुढे ढकलण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. या परीक्षेची नवीन तारीख लवकरच कळवण्यात येईल, असे आरोग्य मंत्रालयाने आपल्या निवेदनात म्हटले आहे. तसेच विद्यार्थ्यांना झालेल्या गैरसोयीबद्दल आरोग्य मंत्रालय मनापासून दिलगीर आहे. विद्यार्थ्यांच्या हितासाठी आणि परीक्षा प्रक्रियेचे पावित्र्य राखण्यासाठी हा निर्णय घेण्यात आला असल्याचे ही आरोग्य मंत्रालयाने म्हटले आहे.
यापूर्वी ही परीक्षा पुढे ढकलली होती
दरम्यान, नॅशनल टेस्टिंग एजन्सी (एटीए) ने शुक्रवारी (दि.21) CSIR-UGC-NET ही परीक्षा पुढे ढकलली होती. ही परीक्षा 25 ते 27 जून दरम्यान होणार होती. साधनांचा अभाव असल्यामुळे CSIR-UGC-NET ही परीक्षा पुढे ढकलण्यात आल्याचे कारण देण्यात आले होते. तर ही परीक्षा एटीएकडून घेण्यात येते. या परीक्षेचे वेळापत्रक देखील लवकरच जाहीर करण्यात येईल, असेही त्यावेळी सांगण्यात आले होते.
NEET UG परीक्षेवरून नाराजी
देशभरात सध्या NEET UG परीक्षेतील कारभारावरून गोंधळाचे वातावरण आहे. या परीक्षेतील गैरप्रकाराबाबत प्रश्नचिन्ह उपस्थित करून त्याची उच्चस्तरीय चौकशी करण्याची मागणी विद्यार्थ्यांनी केली आहे. यासंदर्भात सुप्रीम कोर्टात देखील याचिका दाखल करण्यात आल्या आहेत. तसेच या परीक्षांच्या मुद्द्यावरून विरोधी पक्षांकडून सातत्याने सरकारवर टीका केली जात आहे. या पार्श्वभूमीवर, केंद्राने कालच स्पर्धा परीक्षांतील गैरप्रकारांना आळा घालण्यासाठी देशात कडक कायदा लागू केला आहे.