दिल्ली, 05 जुलै: (विश्वजीत खाटमोडे) नॅशनल बोर्ड ऑफ एक्झामिनेशन इन मेडिकल सायन्सेस (NBEMS) ने आज NEET PG या परीक्षेची सुधारित तारीख जाहीर केली आहे. त्यानुसार, NEET PG ही परीक्षा आता 11 ऑगस्ट 2024 रोजी होणार आहे. याआधी ही परीक्षा 23 जून रोजी होणार होती. परंतु, परीक्षेच्या एक दिवस आधी आरोग्य मंत्रालयाने NEET PG परीक्षा पुढे ढकलली होती. त्यानंतर आज या परीक्षेची नवीन तारीख जाहीर करण्यात आली आहे. ही परीक्षा दोन शिफ्टमध्ये घेण्यात येणार आहे. उत्तम व्यवस्था सुनिश्चित करण्यासाठी विद्यार्थ्यांची परीक्षा दोन शिफ्टमध्ये घेतली जात आहे. या परीक्षेच्या संबंधित असणारी अधिक माहिती लवकरच बोर्डाच्या natboard.edu.in या अधिकृत वेबसाईटवर दिली जाईल, असे एनबीईएमएस ने सांगितले आहे.
https://x.com/ANI/status/1809146252527128906?s=19
परीक्षा 11 ऑगस्ट रोजी परीक्षा होणार
ज्या उमेदवारांनी NEET PG या परीक्षेसाठी अर्ज केला होता, त्यांची आता 11 ऑगस्ट रोजी परीक्षा होणार आहे. नुकत्याच झालेल्या काही स्पर्धा परीक्षांच्या गैरप्रकारांबाबतच्या घटना लक्षात घेता, आरोग्य मंत्रालयाने वैद्यकीय विद्यार्थ्यांसाठी राष्ट्रीय परीक्षा मंडळाने घेतलेल्या NEET PG परीक्षेच्या प्रक्रियेचे सखोल मूल्यांकन करण्याचा निर्णय घेतला होता. या पार्श्वभूमीवर, आरोग्य मंत्रालयाने 23 जून 2024 रोजी होणारी NEET PG पुढे ढकलण्याचा निर्णय घेतला होता.
NEET परीक्षेमुळे नाराजीचे वातावरण
त्यावेळी आरोग्य मंत्रालयाने विद्यार्थ्यांच्या हितासाठी आणि परीक्षा प्रक्रियेचे पावित्र्य राखण्यासाठी हा निर्णय घेण्यात आला असल्याचे म्हटले होते. दरम्यान, देशभरात सध्या NEET UG परीक्षेतील गैरप्रकारांच्या घटनांमुळे गोंधळाचे वातावरण आहे. विद्यार्थ्यांनी या परीक्षेतील गैरप्रकाराबाबत प्रश्नचिन्ह उपस्थित करून त्याची उच्चस्तरीय चौकशी करण्याची मागणी केली आहे. यासंदर्भात त्यांच्याकडून सुप्रीम कोर्टात देखील याचिका दाखल करण्यात आल्या आहेत. दरम्यान, नीट परीक्षेतील गैरप्रकाराच्या पार्श्वभूमीवर, केंद्र सरकारने देशभरात सार्वजनिक परीक्षा कायदा लागू केला आहे.