दिल्ली, 05 जून: (विश्वजीत खाटमोडे) लोकसभा निवडणुकीचे सर्व जागांचे निकाल मध्यरात्री उशीरा हाती आले आहेत. या निवडणुकीत एनडीएला सलग तिसऱ्यांदा बहुमत मिळाले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या लोकप्रियतेमुळे एनडीएला ही निवडणूक जिंकण्यात यश आले असल्याचे म्हटले जात आहे. यंदाच्या लोकसभा निवडणुकीत एनडीएला 292 जागांवर समाधान मानावे लागले. तर यावेळी इंडिया आघाडीला 234 जागा मिळाल्या. या निकालात भाजपच सर्वात मोठा पक्ष ठरला आहे. या निवडणुकीत भाजपला सर्वाधिक 240 जागा मिळाल्या. तर काँग्रेस 99 जागा मिळवून दुसऱ्या क्रमांकावर राहिला.
एनडीएला किती जागा?
एनडीए बाबत बोलायचे झाल्यास, यामध्ये भाजप सर्वाधिक 240 जागा, चंद्राबाबू नायडू यांच्या तेलुगू देसम पक्षाला (टीडीपी) 16 जागा, नितीश कुमार यांच्या जनता दल युनायटेडला (जेडीयू) 12 जागा, लोक जनशक्ती पक्षाला (रामविलास) 5, शिवसेना (शिंदे) 7, राष्ट्रीय लोकदलाला 2, जनसेना पक्षाला 2, जनता दल सेक्युलरला (जेडीएस) 2 जागा मिळाल्या आहेत. तर एनडीए मधील बाकी पक्षांना प्रत्येकी 1 जागा मिळाली आहे.
इंडिया आघाडीला किती जागा?
इंडिया आघाडीमध्ये काँग्रेसला सर्वाधिक 99 जागा, काँग्रेसनंतर समाजवादी पक्ष 37 जागा, तृणमूल काँग्रेस (टीएमसी) 29 जागा, द्रमुक 22 जागा, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष 9 जागा, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्ष 8 जागा, भारतीय कम्युनिस्ट पक्षाला CPI(M) 4 जागा, राष्ट्रीय जनता दल पक्षाला 4 जागा, इंडियन युनियन मुस्लिम लीगला 4 जागा, आम आदमी पार्टीला 3 जागा, झारखंड मुक्ती मोर्चाला 3 जागा, भारतीय कम्युनिस्ट पक्षाला CPI (ML) 2 जागा, भारतीय कम्युनिस्ट पक्ष (सीपीआय) 2 जागा आणि जम्मू-काश्मीर नॅशनल कॉन्फरन्सने 2 जागा जिंकल्या आहेत. तर इंडिया आघाडी मधील इतर पक्षांना प्रत्येकी 1 जागा मिळाली आहे.
यंदा भाजपच्या जागा कमी झाल्या
दरम्यान एनडीए आघाडीतील सर्वात मोठा पक्ष भाजप ठरला आहे. भाजपने यंदाच्या लोकसभा निवडणुकीत 240 जागा जिंकल्या आहेत. तर 2014 च्या लोकसभा निवडणुकीत भाजपने एकहाती 282 जागा जिंकून बहुमताचा आकडा पार केला होता. तसेच 2019 च्या लोकसभा निवडणुकीत देखील भाजपने 303 जागा जिंकल्या होत्या. परंतू, यावेळेस भाजपला 60 हून अधिक जागांचा फटका बसला आहे. त्यामुळे भाजपला देशाची सत्ता मिळवायची असेल तर, त्यांना तेलुगू देसम पक्ष आणि जेडीयू यांसारख्या आपल्या मित्रपक्षांना सोबत ठेवणे गरजेचे आहे.