राष्ट्रवादीच्या शरद पवार गटाला मिळाले नवे पक्षचिन्ह!

नवी दिल्ली, 22 फेब्रुवारीः (विश्वजीत खाटमोडे) निवडणूक आयोगाने राष्ट्रवादीच्या शरद पवार गटाला नवे चिन्ह दिले आहे. त्यानुसार, राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष – शरदचंद्र पवार पक्षाचे ‘तुतारी वाजवणारा माणूस’ हे नवे चिन्ह असणार आहे. आगामी निवडणुकांमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष – शरदचंद्र पवार पक्ष तुतारी या चिन्हावर निवडणूक लढविणार आहे. याबाबतची माहिती राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष – शरदचंद्र पवार पक्षाच्या ट्विटर हँडलवरून देण्यात आली आहे.

https://twitter.com/NCPspeaks/status/1760714746230395024?s=19

तुतारी रणशिंग फुंकण्याकरिता सज्ज!

“महाराष्ट्राच्या इतिहासात छत्रपती शिवरायांच्या शौर्यानं ज्या तुतारीने दिल्लीच्या तख्ताच्याही कानठळ्या बसवल्या होत्या, तीच ‘तुतारी’ आज निवडणूक चिन्ह म्हणून निश्चित होणं ही ‘राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष- शरदचंद्र पवार’साठी गौरवास्पद बाब आहे. महाराष्ट्राचं आराध्यदैवत छत्रपती शिवाजी महाराज, फुले, शाहू, आंबेडकरांच्या पुरोगामी विचारांनी, आदरणीय खा. शरदचंद्र पवार साहेबांच्या साथीने दिल्लीच्या तख्ताला हादरवून सोडण्यासाठी हीच ‘तुतारी’ पुन्हा एकदा रणशिंग फुंकण्याकरिता सज्ज आहे!” असे राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष- शरदचंद्र पवार पक्षाने या ट्विटमध्ये म्हटले आहे.

तुतारी चिन्हावर निवडणूक लढविणार

दरम्यान, राष्ट्रवादीच्या फुटीनंतर निवडणूक आयोगाने अजित पवार गटाला राष्ट्रवादी पक्षाचे नाव आणि घड्याळ चिन्ह दिले होते. त्यावेळी निवडणूक आयोगाने शरद पवार गटाला राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष- शरदचंद्र पवार असे पक्षाचे नाव दिले होते. त्यानंतर निवडणूक आयोगाने आज शरद पवार गटाला तुतारी हे पक्षचिन्ह दिले आहे. त्यामुळे शरद पवार गटाचे उमेदवार तुतारी चिन्ह घेऊन आगामी लोकसभा निवडणुकीच्या रिंगणात उतरणार आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *