येवला, 23 नोव्हेंबर: (विश्वजीत खाटमोडे) महाराष्ट्राच्या विधानसभा निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते छगन भुजबळ यांनी नाशिक जिल्ह्यातील येवला मतदारसंघात विजय मिळवला आहे. या निवडणुकीत छगन भुजबळ यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाचे उमेदवार माणिकराव शिंदे यांचा 26 हजार 400 मतांनी पराभव केला. यावेळी छगन भुजबळ यांना 1 लाख 35 हजार 023 मते मिळाली. तर माणिकराव शिंदे यांना 1 लाख 08 हजार 623 लोकांनी मत दिले आहे.
https://x.com/ChhaganCBhujbal/status/1860290017307873333?t=FNP7yR9-2zk0Rb1bWidtGQ&s=19
छगन भुजबळ यांनी मानले आभार
या विजयाबद्दल छगन भुजबळ यांनी जनतेचे आभार मानले आहेत. यासंदर्भात त्यांनी ट्विट केले आहे. “येवला लासलगाव मतदारसंघातील जनतेने जातीपातीला थारा न देता विकासाला कौल दिला आहे. हा विजय गोरगरीब कष्टकरी जनतेच्या विश्वासाचा आणि निरंतर विकास कामांचा आहे. सर्व जाती-धर्मातील बांधवांनी माझ्या विकासाच्या विचारांना पाठिंबा दिला, यासाठी मी सर्व मतदारांचे मनापासून आभार मानतो,” अशी प्रतिक्रिया छगन भुजबळांनी या ट्विटमधून दिली आहे.
छगन भुजबळ विरूद्ध माणिकराव शिंदे लढत
दरम्यान, राष्ट्रवादी पक्षातील वादानंतर छगन भुजबळ यांनी अजित पवार यांना पाठिंबा दिला. त्यानंतर छगन भुजबळ यांना राज्याचे मंत्रिपद देखील मिळाले. तर गेल्या काळात छगन भुजबळ यांनी मराठा आरक्षणाला सातत्याने विरोध दर्शवला होता. त्यामुळे येवला मतदारसंघात छगन भुजबळ यांना आरक्षणाच्या विरोधाचा फटका बसेल, अशी चर्चा राजकीय वर्तुळात सुरू होती. अशा परिस्थितीत शरद पवारांनी येवला मतदारसंघात छगन भुजबळ यांच्या विरोधात माणिकराव शिंदे यांना उमेदवारी दिली. त्यामुळे छगन भुजबळ विरूद्ध माणिकराव शिंदे या लढतीकडे राज्याचे लक्ष लागले होते. या पार्श्वभूमीवर छगन भुजबळ यांच्यासाठी ही निवडणूक प्रतिष्ठेची बनली होती. तर या निवडणुकीत विजय मिळवत छगन भुजबळ यांनी येवल्याचा गड कायम राखला आहे.
2004 पासून येवल्यात आमदार
छगन भुजबळ हे येवला विधानसभा मतदारसंघात 2004 पासून आमदार राहिले आहेत. त्यांनी या मतदारसंघात सलग चारवेळा निवडून आले होते. छगन भुजबळ यांनी यापूर्वी 2004, 2009, 2014 आणि 2019 च्या विधानसभा निवडणुकीत विजय मिळवलेला आहे. यंदाच्या विधानसभा निवडणुकीतील छगन भुजबळ यांचा हा सलग पाचवा विजय ठरला आहे. त्यामुळे येवला मतदारसंघ हा छगन भुजबळ यांचा बालेकिल्ला असल्याचे पुन्हा एकदा सिद्ध झाले आहे.