अरुणाचल विधानसभा निवडणुकीत राष्ट्रवादीने 3 जागांवर विजय मिळवला, अजित पवारांनी केले उमेदवारांचे अभिनंदन

मुंबई, 02 जून: (विश्वजीत खाटमोडे) अरुणाचल प्रदेश विधानसभा निवडणुकीचा निकाल आज लागला. या निवडणूकीत भाजपने विजय मिळवत 60 पैकी सर्वाधिक 46 जागा जिंकल्या आहेत. तर एनपीईपीने 5 जागा, आयएनडी 3 जागा, तर पीपीएने 2 जागा आणि काँग्रेसने एका जागांवर विजय मिळवला आहे. विशेष म्हणजे, अरुणाचल प्रदेशातील विधानसभा निवडणुकीत अजित पवार यांच्या राष्ट्रवादीने 3 जागा जिंकण्याची कामगिरी केली आहे. राष्ट्रवादीच्या यशामुळे राजकीय वर्तुळात सध्या आश्चर्य व्यक्त केले जात आहे.

https://twitter.com/ANI/status/1797198320785609189?s=19

https://twitter.com/AjitPawarSpeaks/status/1797257055222346002?s=19

अजित पवार काय म्हणाले?

दरम्यान, राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष तथा राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी अरुणाचल प्रदेशातील विधानसभा निवडणुकीत राष्ट्रवादीच्या निवडून आलेल्या तिन्ही आमदारांचे अभिनंदन केले आहे. यासंदर्भात अजित पवारांनी सोशल मीडियावर पोस्ट शेयर केली आहे. “अरुणाचल प्रदेश येथे पार पडलेल्या विधानसभा निवडणूक 2024 मध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे 3 उमेदवार निवडून आल्याबद्दल मी तिन्ही उमेदवारांचं मनापासून अभिनंदन करतो. हा विजय ऐतिहासिक असून या निवडणुकीत अरुणाचल प्रदेशमधील पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी घेतलेले अथक परिश्रम आज फळास आले आहेत. त्यामुळे त्यांचं देखील अभिनंदन करतो,” असे अजित पवार यामध्ये म्हणाले

इतकी मतं मिळाली याचा आनंद…

या पोस्टमध्ये पुढे अजित पवार म्हणाले की, “विशेष बाब म्हणजे एकूण मतांच्या 10.06 टक्के मतं राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या पदरात पडली, याचा फार आनंद आहे. अरुणाचल प्रदेशच्या मतदार राजानं आमच्या पक्षाच्या उमेदवारांवर दाखवलेला विश्वास हीच आमची ताकद असून याच ताकदीच्या जोरावर यापुढे विकासाची गंगा अरुणाचल प्रदेशमध्ये वाहेल असा शब्द देतो.” तसेच राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची विकासाची पावलं पुढे पडत आहेत आणि अरुणाचल प्रदेशमधील यश हे पक्षाच्या प्रगतीचे द्योतक आहे. लोकशाहीची मुल्ये अंगीकारून आमचा पक्ष देशभर विकासाचे नवनवे आदर्श उभे करेल यात काही शंका नाही. देशाच्या सामाजिक व आर्थिक विकासाला चालना देण्यासाठी आम्ही कटीबद्ध आहोत, अशी ग्वाही अजित पवारांनी दिली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *