बारामती, 23 एप्रिल: (विश्वजीत खाटमोडे) देशात सध्या लोकसभा निवडणुकीचे वारे वाहू लागले आहे. त्यासाठी सर्वच राजकीय पक्ष तयारीला लागले आहेत. राजकीय पक्षांचे उमेदवार आणि कार्यकर्ते सध्या गावागावांत प्रचार करताना दिसत आहेत. तसेच उमेदवारांच्या प्रचारासाठी अनेक राजकीय पक्षांचे प्रमुख नेते सभा घेत असल्याचे दिसत आहे. बारामती लोकसभा मतदारसंघात महायुतीच्या उमेदवार सुनेत्रा पवार यांना निवडणुकीचे तिकीट मिळाले आहे. त्या अनुषंगाने महायुतीच्या कार्यकर्त्यांकडून सध्या सुनेत्रा पवार यांचा बारामती मतदारसंघात जोरदार प्रचार केला जात आहे.
या पार्श्वभूमीवर, पुणे जिल्हा राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे उपाध्यक्ष साधू बल्लाळ यांनी महायुतीच्या उमेदवार सुनेत्रा पवार यांच्या प्रचारार्थ बारामती लोकसभा मतदारसंघातील सोमेश्वर नगर, वाघळवाडी आणि निरा येथे महायुतीच्या प्रमुख पदाधिकाऱ्यांच्या भेटीगाठी घेतल्या. तसेच त्यांनी यावेळी पुरंदर तालुक्यातील पिंपरे खुर्द या ठिकाणी बौद्ध समाज मंदिरात बौद्ध समाजाची बैठक घेतली. याप्रसंगी, बौद्ध समाजाने सुनेत्रा पवार यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहण्याचा निर्धार केला. तसेच यावेळी बौद्ध समाजाने त्यांना सुनेत्रा पवार यांच्या पारड्यात 100% मतदान पडेल, अशी ग्वाही दिली. याप्रसंगी, पुणे जिल्हा राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे उपाध्यक्ष साधू बल्लाळ यांच्यासह पुणे जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेसच्या सामाजिक न्याय विभागाचे जिल्हा उपाध्यक्ष हेमंत गडकरी, जिल्हा युवक सरचिटणीस प्रदीप मांगडे, नाना सोनवणे, बौद्ध समाजातील ज्येष्ठ मंडळी, युवा कार्यकर्ते उपस्थित होते.