अजित पवारांच्या उपस्थितीत राष्ट्रवादीचा जाहीरनामा प्रसिद्ध

मुंबई, 22 एप्रिल: (विश्वजीत खाटमोडे) लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर, अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचा जाहीरनामा आज प्रसिद्ध करण्यात आला आहे. हा कार्यक्रम मुंबईत राष्ट्रवादी पक्षाचे अध्यक्ष तथा राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत पार पडला. या जाहीरनाम्यातून राष्ट्रवादी पक्षाने विविध घोषणा केल्या आहेत. यामध्ये शेती, उद्योग, वीज, पाणी, शिक्षण यांसारख्या अनेक क्षेत्रासाठी विविध प्रकारच्या घोषणा करण्यात आल्या आहेत.

https://twitter.com/Dwalsepatil/status/1782367803108147362?s=19

https://twitter.com/mahancpspeaks/status/1782372755230396869?s=19

जाहीरनाम्यात कोणत्या घोषणा?

मराठीला अभिजात भाषेचा दर्जा मिळावा यासाठी पाठपुरावा करणार, स्व. यशवंतराव चव्हाण यांना भारतरत्न द्यावा, शेतकऱ्यांच्या शेतमालाला हमीभाव मिळावा, अपारंपरिक वीज निर्मिती, अपारंपरिक वीज निर्मितीला चालना मिळावी, उद्योगांना प्राधान्य, कृषी पिकविम्याच्या व्याप्तीत वाढ, शेतकरी सन्मान निधीत भरीव वाढ, मुद्रा कर्ज योजनेत मर्यादित वाढ, जातीनिहाय जनगणना, ऊर्दू शाळांना सेमी इंग्रजीचा दर्जा, वन क्षेत्रात पाण्याचे साठे निर्माण व्हावेत यासाठी योजना, संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेत भारताला स्थायी सदस्यत्व मिळावे यासाठी पाठिंबा देणे, यांसारख्या घोषणा या जाहीरनाम्यात करण्यात आल्या आहेत.

अजित पवारांनी काय म्हटले?

“राष्ट्रवादी काँग्रेसची विकसित भारतासाठीची भूमिका स्पष्ट करणारा हा जाहिरनामा आहे. यात सार्वजनिक सेवा, पायाभूत सुविधासह आर्थिक प्रगतीचा संकल्प व्यक्त करण्यात आला आहे. यामध्ये आरोग्य, शिक्षण, स्वच्छता, पर्यावरण आणि रोजगार ही ग्रामविकासाची पंचसूत्री असून, त्यानुसार आम्ही काम करणार आहोत,” असे अजित पवार यांनी यावेळी स्पष्ट केले. देशाच्या स्वातंत्र्याची 75 वर्षे पूर्ण झालेली आहेत. या अमृतकाळातील लोकसभा 2024 साठीचा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचा जाहीरनामा आम्ही जनतेच्या हाती सोपवत आहोत. राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष कायम विकास आणि विश्वासाने राज्यातील जनतेचा पसंतीचा पक्ष राहील आणि ‘राष्ट्रासाठी राष्ट्रवादी’ या भूमिकेचा जनता स्वीकार करेल, असे अजित पवार या कार्यक्रमात बोलताना म्हणाले आहेत.

याप्रसंगी, राष्ट्रवादीचे कार्याध्यक्ष खासदार प्रफुल पटेल, प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे, राज्याचे अन्न व नागरी पुरवठामंत्री छगन भुजबळ, विधानसभा उपाध्यक्ष नरहरी झिरवाळ, वैद्यकीय शिक्षणमंत्री हसन मुश्रीफ, कृषिमंत्री धनंजय मुंडे, मदत व पुनर्वसन मंत्री अनिल पाटील, महिला व बालविकास मंत्री अदिती तटकरे, प्रदेश सरचिटणीस शिवाजीराव गर्जे, राष्ट्रवादीच्या महिला प्रदेशाध्यक्ष रुपाली चाकणकर, मुंबई विभागीय अध्यक्ष समीर भुजबळ, राष्ट्रीय प्रवक्ते ब्रिजमोहन श्रीवास्तव, अल्पसंख्याक विभागचे राष्ट्रीय अध्यक्ष सैय्यद जलालुद्दीन, मुख्य प्रवक्ते उमेश पाटील, युवक प्रदेशाध्यक्ष सूरज चव्हाण, बाबा सिद्दीकी, प्रदेश उपाध्यक्ष प्रमोद हिंदूराव, प्रदेश उपाध्यक्ष सलीम सारंग, प्रदेश प्रवक्ते संजय तटकरे, प्रदेश प्रवक्ते आनंद परांजपे, प्रदेश सरचिटणीस नजीब मुल्ला, मुंबई कार्याध्यक्ष नरेंद्र राणे, मुंबई युवक अध्यक्ष सुनिल गिरी यांच्यासह अनेक पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *