मुंबई, 07 फेब्रुवारी: नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरो (एनसीबी) च्या मुंबई विभागीय युनिटने 31 जानेवारी रोजी मोठी कारवाई करत आंतरराष्ट्रीय स्तरावर कार्यरत असलेल्या ड्रग्स टोळीचा पर्दाफाश केला आहे. या कारवाईत 11.540 किलो उच्च प्रतीचे कोकेन, 4.9 किलो हायब्रीड स्ट्रेन हायड्रोपोनिक गांजा, 5.5 किलो वजनाची कॅनॅबिस गमीजची 200 पाकिटे आणि 1 लाख 60 हजार रुपयांची रोकड असा करोडो रुपयांचा ऐवज जप्त करण्यात आला. ही कारवाई मुंबईत करण्यात आली. याप्रकरणी 4 जणांना अटक करण्यात आली आहे. याची माहिती एनसीबीने आज (दि.07) दिली.
https://x.com/ANI/status/1887760537020473742?t=TOyekl3JRADesDKriAXIlw&s=19
परदेशातून टोळी चालवली जात होती
एनसीबीच्या तपासात समोर आले आहे की, ही टोळी परदेशातून चालवली जात होती. जप्त करण्यात आलेले काही अमली पदार्थ अमेरिकेतून मुंबईत आणले गेले होते. त्यानंतर कुरियर, छोटे कार्गो आणि डिलिव्हरी बॉयच्या मदतीने भारतातील तसेच परदेशातील विविध ठिकाणी ते पोहोचवले जात होते. या कारवाईत आतापर्यंत चार जणांना अटक करण्यात आली असून, या प्रकरणी एनसीबी सर्व बाजूंनी तपास करीत आहे. तसेच ड्रग्सची मागणी आणि पुरवठ्याचा संपूर्ण साखळी शोधण्यासाठी तपास यंत्रणा अधिक खोलवर जाऊन तपास करीत आहे.
एनसीबीच्या या मोठ्या कारवाईमुळे मुंबई आणि आसपासच्या परिसरात मोठ्या प्रमाणावर अमली पदार्थांचा पुरवठा करणाऱ्यांना मोठा दणका बसला आहे. मागील काही काळापासून एनसीबीने अशा अनेक मोठ्या कारवाया केल्या असून, देशभरातील ड्रग्स नेटवर्क मोडीत काढण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. अमली पदार्थांचा वाढता धोका आणि त्यामागील टोळ्यांचे वाढते जाळे लक्षात घेता एनसीबीकडून कठोर कारवाई सुरू आहे. या प्रकरणात आणखी अटक होण्याची शक्यता असून, पुढील तपास सुरू आहे.