गडचिरोली, 02 फेब्रुवारी: (विश्वजीत खाटमोडे) गडचिरोली जिल्ह्यातील भामरागड तालुक्यातील कियर गावात नक्षलवाद्यांनी एका नागरिकाची हत्या केल्याची घटना उघडकीस आली आहे. आज (दि.02) पहाटे सुखराम मडावी (वय-45 वर्षे) यांची गळा आवळून हत्या करण्यात आली. या घटनेमुळे परिसरात भीतीचे वातावरण पसरले आहे. दरम्यान, हत्या झालेल्या ठिकाणी नक्षलवाद्यांनी एक पत्र टाकले असून, त्यामध्ये त्यांनी सुखराम मडावी यांच्यावर पोलिसांचे खबऱ्या असल्याचा खोटा आरोप केला आहे. तसेच या भागात पेनगुंडासारखे नवीन कॅम्प सुरू करण्यासाठी सुखराम मडावी यांनी पोलिसांना मदत केली असल्याचा दावा या पत्रात करण्यात आलेला आहे.
https://x.com/ANI/status/1885909648538317268?t=mGMX0WM8eXq9WTjBXjtCIw&s=19
पोलिसांनी काय म्हटले?
या वर्षातील नक्षलवाद्यांनी केलेली नागरिकाची ही पहिली हत्या असून, या प्रकरणाचा अधिक तपास गडचिरोली पोलीस करत आहेत, अशी माहिती गडचिरोलीचे पोलिस अधीक्षक नीलोत्पल यांनी दिली आहे. गडचिरोली पोलिसांनी घटनास्थळी जाऊन तपास सुरू केला आहे. प्राथमिक तपासानुसार, नक्षलवाद्यांनी मडावी यांना शनिवारी (दि.01) रात्री घरातून गावाबाहेर नेले आणि त्यानंतर नक्षलवाद्यांनी त्यांना बेदम मारहाण करीत त्यांची गळा आवळून निघृण हत्या केली. आज सकाळी त्यांचा मृतदेह आढळून आला, असे पोलिसांनी सांगितले.
नक्षलवादी पुन्हा सक्रिय?
यापूर्वी, या घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. या हत्येचा तपास सुरू असून, नक्षलवाद्यांच्या हालचालींवर पोलिसांचे लक्ष आहे. दरम्यान, या घटनेमुळे मागील काही काळापासून शांत असलेला नक्षलवाद्यांचा गट पुन्हा एकदा सक्रिय झाला आहे की काय? अशी शंका नागरिकांच्या मनात निर्माण झाली आहे. या घटनेनंतर परिसरात दहशतीचे वातावरण असून, गावकऱ्यांमध्ये भीती पसरली आहे. या पार्श्वभूमीवर पोलिसांनी या भागात गस्त वाढवली असून, पुढील तपास सुरू आहे.