दिल्ली, 10 फेब्रुवारी: (विश्वजीत खाटमोडे) छत्तीसगडच्या बिजापूर जिल्ह्यात सुरक्षा दलांनी मोठी कारवाई करत 31 नक्षलवाद्यांचा खात्मा केला. या कारवाईनंतर केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी ट्विट केले आहे. 31 मार्च 2026 पूर्वी देशातून नक्षलवादाचा संपूर्ण नायनाट केला जाईल, जेणेकरून देशातील कोणत्याही नागरिकाला यामुळे जीव गमवावा लागणार नाही, असे अमित शहा यांनी यामध्ये म्हटले आहे. त्याचबरोबर अमित शहा यांनी हे भारताला नक्षलमुक्त करण्याच्या दिशेने सुरक्षा दलांचे मोठे यश असल्याचे देखील सांगितले आहे.
https://x.com/AmitShah/status/1888524232809963700?t=eZqLDctXQ5-sw8Wo0tUq9A&s=19
अमित शहा काय म्हणाले?
नक्षलमुक्त भारत करण्याच्या दिशेने छत्तीसगडमधील बिजापूरमध्ये सुरक्षा दलांना मोठे यश मिळाले आहे. या कारवाईत 31 नक्षलवाद्यांना ठार मारण्यासोबतच मोठ्या प्रमाणात शस्त्रे आणि स्फोटक साहित्यही जप्त करण्यात आले आहे. नक्षलवाद संपवण्याच्या लढाईत आम्ही दोन शूर जवान गमावले आहेत. देश त्यांच्या बलिदानाचा सदैव ऋणी राहील. शहीद जवानांच्या कुटुंबियांप्रती मी मनापासून संवेदना व्यक्त करतो. असे अमित शहा यांनी या ट्विटमध्ये म्हटले आहे.
नक्षलवादाचा पूर्णपणे नायनाट करणार – अमित शहा
तसेच गृहमंत्र्यांनी सांगितले की, “31 मार्च 2026 पर्यंत नक्षलवादाचे पूर्ण उच्चाटन केले जाईल याबाबत सरकार कटिबद्ध आहे. देशातील कोणत्याही नागरिकाला यामुळे जीव गमवावा लागणार नाही.” दरम्यान,बिजापूरमधील कारवाईनंतर या संपूर्ण भागात शोधमोहीम तीव्र करण्यात आली आहे. अमित शाह यांनी स्पष्ट केले की, देश नक्षलवादाच्या विळख्यातून मुक्त होईपर्यंत सुरक्षा दलांची कठोर कारवाई सुरू राहील.
31 नक्षलवादी ठार
छत्तीसगडमधील बिजापूर जिल्ह्यात, नक्षलवाद्यांचा बालेकिल्ला मानल्या जाणाऱ्या राष्ट्रीय उद्यान परिसरात सुरक्षा दल आणि नक्षलवाद्यांमध्ये चकमक झाली. या चकमकीत 31 नक्षलवाद्यांना ठार मारण्यासोबतच मोठ्या प्रमाणात शस्त्रे आणि स्फोटकेही जप्त करण्यात आली. त्याचबरोबर या कारवाईदरम्यान सुरक्षा दलाचे 2 जवान शहीद झाले. तसेच त्यावेळी 2 जवान जखमी झाले. या जखमी जवानांना विमानाने रुग्णालयात नेण्यात आले. त्यांच्यावर सध्या रुग्णालयात उपचार सुरू आहेत. या जवानांची प्रकृती सध्या स्थिर आहे.