नवाब मलिक 29 तारखेला उमेदवारी अर्ज दाखल करणार

मुंबई, 27 ऑक्टोंबर: (विश्वजीत खाटमोडे) अजित पवार गटातील राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते नवाब मलिक यांनी आगामी विधानसभा निवडणुकीत त्यांची उमेदवारी जाहीर केली आहे. त्यानुसार, नवाब मलिक येत्या 29 ऑक्टोबर रोजी मानखुर्द-शिवाजीनगर विधानसभा मतदारसंघातून त्यांचा उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत. त्यामुळे महायुतीचे टेन्शन वाढले आहे. दरम्यान, नवाब मलिक यांच्या उमेदवारीला भाजपने जोरदार विरोध केला आहे. त्यानंतर आगामी विधानसभा निवडणुकीसाठी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने काही दिवसांपूर्वी नवाब मलिक यांची कन्या सना मलिक यांना अणुशक्ती नगर मतदारसंघातून उमेदवारी दिली होती. त्यामुळे नवाब मलिक यांच्या भूमिकेकडे लक्ष लागले होते. त्यानंतर आता नवाब मलिक यांनी मानखुर्द-शिवाजीनगर विधानसभा मतदारसंघातून त्यांची उमेदवारी जाहीर केली आहे.

https://x.com/ANI/status/1850192543058886788?t=76RQcqqeO3GMzz6t7gwEIg&s=19

नवाब मलिक काय म्हणाले?

यासंदर्भात नवाब मलिक यांनी त्यांची भूमिका स्पष्ट केली आहे. “मी मानखुर्द-शिवाजीनगर विधानसभा मतदारसंघातून 29 ऑक्टोबर रोजी उमेदवारी अर्ज दाखल करणार आहे. जनतेने मला येथून निवडणूक लढविण्याची विनंती केली आहे. मानखुर्द-शिवाजीनगर मध्ये सुरू असलेल्या गुंडगिरी आणि अमली पदार्थांच्या धंद्यामुळे जनता प्रचंड नाराज आहे. जनतेला बदल हवा आहे. त्यामुळे मी मानखुर्द-शिवाजीनगर मधून निवडणूक लढवणार आहे आणि नक्कीच जिंकेन. मला कोण विरोध करत आहे याची मला पर्वा नाही, जनता मला साथ देत आहे आणि मी निवडणूक लढवणार आहे,” असे नवाब यांनी म्हटले आहे.

महायुतीकडून आतापर्यंत 215 उमेदवार जाहीर

दरम्यान, राज्यातील विधानसभा निवडणुकीसाठी 22 नोव्हेंबर रोजी मतदान होणार आहे. या पार्श्वभूमीवर, महायुती आणि महाविकास आघाडीकडून उमेदवारांची घोषणा करण्यात येत आहे. यामध्ये महायुतीकडून आतापर्यंत 215 उमेदवारांच्या नावांची घोषणा करण्यात आली आहे. या यादीत भाजपचे सर्वाधिक 121 उमेदवार आहेत. तसेच राष्ट्रवादीचे 49 आणि शिवसेनेचे 45 उमेदवार आहेत. तर महायुतीला उर्वरित 73 जागांवर उमेदवार जाहीर करायचे आहेत. या जागांच्या संदर्भात महायुतीच्या नेत्यांमध्ये चर्चा सुरू आहे. यामध्ये मानखुर्द-शिवाजीनगर मतदारसंघाचा देखील समावेश आहे.

अबू आझमी सध्याचे आमदार

मानखुर्द-शिवाजीनगर मध्ये समाजवादी पार्टीचे नेते अबू आझमी विद्यमान आमदार आहेत. यांनी या मतदारसंघात गेल्या 3 विधानसभा निवडणुकीत त्यांनी विजय मिळवला आहे. त्यामुळे या निवडणुकीत नवाब मलिक यांच्यासमोर अबू आझमी यांचे कडवे आव्हान असणार आहे. त्याचवेळी राष्ट्रवादी पक्षाने नवाब मलिक यांच्या उमेदवारीची अजून कसलीही घोषणा केलेली नाही. त्यामुळे येत्या 29 तारखेला नवाब मलिक हे अपक्ष की राष्ट्रवादीकडून उमेदवारी अर्ज दाखल करतात? हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *