उमेदवारी मिळाल्यानंतर नवनीत राणा यांचा भाजपमध्ये जाहीर प्रवेश!

अमरावती, 28 मार्च: (विश्वजीत खाटमोडे) लोकसभा निवडणुकीसाठी भाजपने आपल्या उमेदवारांची सातवी यादी जाहीर केली आहे. यामध्ये अमरावती मतदारसंघातून भाजपने नवनीत राणा यांना उमेदवारी दिली आहे. त्यानंतर नवनीत राणा यांनी युवा स्वाभिमान पक्षाचा राजीनामा दिला आहे. यावेळी नवनीत राणा भावूक झाल्या होत्या. स्वतःच्याच पक्षाचा राजीनामा दिल्यामुळे त्यांच्या डोळ्यात अश्रू आले होते. नवनीत राणा युवा स्वाभिमान पक्षाच्या कार्याध्यक्षा होत्या. उमेदवारी मिळाल्यामुळे नवनीत राणा यांनी काल रात्री उशीरा भारतीय जनता पार्टीत जाहीर प्रवेश केला आहे. हा पक्षप्रवेशाचा कार्यक्रम नागपूर येथे पार पाडला. यावेळी भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी त्यांचे भाजपमध्ये स्वागत केले. याप्रसंगी, भाजपचे कार्यकर्ते आणि पदाधिकारी उपस्थित होते.

https://twitter.com/ANI/status/1772979201076822332?s=19

https://twitter.com/navneetravirana/status/1773033348660670676?s=19

https://twitter.com/ANI/status/1773056456197038102?s=19

भाजपकडून अमरावतीचे तिकीट

दरम्यान, नवनीत राणा यांच्या उमेदवारीला महायुतीतील अपक्ष आमदार बच्चू कडू आणि शिवसेना नेते आनंदराव अडसूळ यांनी कडाडून विरोध केला होता. तरी देखील भाजपने नवनीत राणा यांना लोकसभेचे तिकीट दिल्यामुळे महायुतीत वाद वाढण्याची शक्यता आहे. या नेत्यांची नाराजी दूर करण्यासाठी महायुतीतील वरिष्ठ नेत्यांना मोठी कसरत करावी लागणार आहे. दरम्यान, नवनीत राणा अमरावतीच्या खासदार आहेत. नवनीत राणा यांनी 2019 मध्ये अमरावतीमधून अपक्ष उमेदवार म्हणून निवडणूक लढवली होती. त्यावेळी त्यांना राष्ट्रवादीने पाठींबा दिला होता. 2019 च्या लोकसभा निवडणुकीत नवनीत राणा यांनी शिवसेनेचे आनंदराव अडसूळ यांचा पराभव केला होता.

महायुतीमधील नेत्यांची नाराजी दूर होणार?

नवनीत राणा यांना भाजपने आता उमेदवारी दिल्यामुळे अमरावती मतदार संघात आता नवनीत राणा विरुद्ध काँग्रेसचे बळवंत वानखडे अशी लढत होणार आहे. तर महायुतीतील नेत्यांच्या नाराजीमुळे नवनीत राणा यांना सध्यातरी ही निवडणूक सोपी जाणार नसल्याचे दिसत आहे. त्यामुळे महायुतीतील नेत्यांची नाराजी दूर होणार का? हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *