नवी दिल्ली, 04 एप्रिल: (विश्वजीत खाटमोडे) अमरावतीच्या खासदार नवनीत राणा यांना जात प्रमाणपत्र प्रकरणी सुप्रीम कोर्टाने मोठा दिलासा दिला आहे. सुप्रीम कोर्टाने हायकोर्टाचा निर्णय रद्द करीत नवनीत राणा यांचे जात प्रमाणपत्र वैध ठरवले आहे. त्यामुळे नवनीत राणा यांचा लोकसभा निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. दरम्यान, नवनीत राणा यांना भाजपने आगामी लोकसभा निवडणुकीसाठी अमरावती मतदार संघातून उमेदवारी जाहीर केली आहे. तर सुप्रीम कोर्टाच्या या निकालानंतर नवनीत राणा या आज त्यांचा उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत.
https://twitter.com/ANI/status/1775773310636503074?s=19
निवडणूक लढविण्याचा मार्ग मोकळा
तत्पूर्वी, नवनीत राणा यांचे जात प्रमाणपत्र मुंबई हायकोर्टाने 2021 मध्ये रद्द ठरवले होते. त्यावेळी त्यांना हायकोर्टाने दोन लाखांचा दंडही ठोठावला होता. खासदार आनंदराव अडसूळ यांनी नवनीत राणा यांचे जात प्रमाणपत्र बोगस असल्याचा दावा केला होता. याप्रकरणी त्यांनी मुंबई हायकोर्टात याचिका दाखल केली होती. त्यानंतर नवनीत राणा यांनी हायकोर्टाच्या या निर्णयाविरोधात सुप्रीम कोर्टात धाव घेतली होती. त्यांच्या या याचिकेवरील सुनावणी गेल्या महिन्यातच पूर्ण झाली होती. तर आज सुप्रीम कोर्टाने नवनीत राणा यांना दिलासा देत त्यांचे जात प्रमाणपत्र वैध ठरवले आहे. कोर्टाच्या या निर्णयामुळे नवनीत राणा यांना आता लोकसभा निवडणूक लढवता येणार आहे.
युवा स्वाभिमान पक्षाचा राजीनामा दिला होता
दरम्यान, काही दिवसांपूर्वी नवनीत राणा यांना आगामी लोकसभा निवडणुकीसाठी भारतीय जनता पक्षाने अमरावती मतदार संघातून उमेदवारी जाहीर केली होती. त्यानंतर नवनीत राणा यांनी त्यांच्या राष्ट्रीय युवा स्वाभिमान पक्षाच्या कार्याध्यक्षा पदाचा आणि प्राथमिक सदस्यत्वाचा राजीनामा दिला होता. त्यावेळी नवनीत राणा या भावूक झाल्या होत्या. युवा स्वाभिमान पक्षाचा राजीनामा दिल्यानंतर नवनीत राणा यांनी भाजपमध्ये जाहीर प्रवेश केला आहे. त्यामुळे आता आगामी लोकसभा निवडणुकीत अमरावती मतदार संघातून नवनीत राणा या भाजपच्या अधिकृत उमेदवार झाल्या आहेत.