मुंबई, 26 जून: (विश्वजीत खाटमोडे) मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली राज्यातील खरीपाचा आढावा घेण्यासाठी सह्याद्री अतिथीगृहात बैठक पार पडली. या बैठकीला उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार, कृषीमंत्री धनंजय मुंडे, महसूलमंत्री राधाकृष्ण विखे-पाटील, सहकार मंत्री दिलीप वळसे-पाटील, पणन मंत्री अब्दुल सत्तार, ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन, मृद व जलसंधारण मंत्री संजय राठोड या मंत्र्यांसह वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते. या बैठकीतून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी राज्याच्या कृषि विभागाला विविध प्रकारच्या सूचना दिल्या.
https://x.com/CMOMaharashtra/status/1805586431018254662?s=19
शेतकऱ्यांना वेळेवर मदत दिली पाहिजे, मुख्यमंत्र्यांच्या सूचना
नैसर्गिक आपत्ती व शेती पिकांचे नुकसान झालेल्या राज्यातील शेतकरी आणि नागरिकांना येत्या 30 जूनपर्यंत नुकसान भरपाईच्या मदतीचे वाटप पूर्ण करावे, असे निर्देश मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी यावेळी संबंधित अधिकाऱ्यांना दिले. शेतकऱ्यांना वेळेवर मदत दिली गेली पाहिजे. क्षेत्रीय अधिकाऱ्यांनी शेतकऱ्यांसाठी घेतलेल्या निर्णयांची अंमलबजावणी तातडीने करावी, अशा सूचना देखील मुख्यमंत्र्यांनी या बैठकीतून दिल्या आहेत. सोबतच खते, बियाणे याचे लिंकेज करणाऱ्या विक्रेत्यांबरोबरच कंपन्यावरही कडक कारवाई करण्याच्या सूचना यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी कृषी विभागाला दिल्या आहेत.
उपमुख्यमंत्र्यांचे अधिकाऱ्यांना निर्देश
या बैठकीत राज्यातील बी-बियाणे, खते आदींची उपलब्धता, बोगस बियाणे यांच्यासह पीक पाण्याची परिस्थिती, चढ्या भावाने विक्री आदींविरुद्ध सुरू असलेल्या कारवाया यांसारख्या बाबींची माहिती सविस्तर माहिती कृषी विभागाने राज्य सरकारला दिली. तसेच बोगस बियाणे कंपन्यांवर कठोर कारवाई करावी, असे निर्देश यावेळी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अधिकाऱ्यांना दिले. याशिवाय हवामान विभागाने राज्यात जुलै महिन्यात ला-निना मुळे जोरदार पाऊस होण्याचा अंदाज वर्तविला आहे. या पार्श्वभूमीवर, राज्यातील आपत्कालीन यंत्रणा सज्ज करण्याच्या सूचना उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी यावेळी दिल्या.