दिल्ली, 19 मार्च: (विश्वजीत खाटमोडे) काही दिवसांपूर्वी निवडणूक आयोगाने राष्ट्रवादी पक्षाचे नाव आणि घड्याळ चिन्ह अजित पवार गटाला देण्याचा निर्णय घेतला होता. त्यानंतर निवडणूक आयोगाच्या या निर्णयाविरोधात शरद पवार गटाच्या वतीने सुप्रीम कोर्टात याचिका दाखल करण्यात आली होती. या याचिकेवर आज सुनावणी होणार आहे. तत्पूर्वी, काही दिवसांपूर्वी सुप्रीम कोर्टाने अजित पवार गटाला निवडणूक प्रचारात शरद पवार यांचा फोटो वापरू नये, असे निर्देश दिले होते.
NCP vs NCP | Supreme Court questions Ajit Pawar faction of NCP why it is using Sharad Pawar's photo for campaigning.
— ANI (@ANI) March 14, 2024
Supreme Court tells Ajit Pawar faction, “You are a different political party now. You have chosen not to be with him. So why to use his (Sharad Pawar) picture…… pic.twitter.com/tIZnfdsNr9
अजित पवार गटाकडून प्रतिज्ञापत्र सादर
कोर्टाच्या आदेशानंतर अजित पवार यांनी यासंदर्भात स्पष्टीकरण दिले होते. आमचा पक्ष शरद पवारांचा फोटो वापरत नाही, असे कोणी करत असेल तर त्याला समजावून सांगितले जाईल. असे ते त्यावेळी म्हणाले होते. अजित पवार गटाने शरद पवार यांचा फोटो वापरल्याचा आरोप शरद पवार गटाने केला होता. शरद पवार गटाच्या या तक्रारीवर सुप्रीम कोर्टाने अजित पवार गटाला उत्तर मागितले होते. यासंदर्भात त्यांना प्रतिज्ञापत्र सादर करण्याचे निर्देश सुप्रीम कोर्टाने दिले होते. त्यानूसार, अजित पवार गटाने सुप्रीम कोर्टात प्रतिज्ञापत्र सादर केले आहे.
आजच्या सुनावणीत कोणता निर्णय?
तत्पूर्वी, निवडणूक आयोगाने मूळ राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष अजित पवार गटाचा असल्याचा निकाल दिला होता. त्याचवेळी त्यांनी अजित पवार गटाला घड्याळ चिन्ह दिले होते. त्यानंतर निवडणूक आयोगाच्या या निर्णयाविरोधात शरद पवार यांच्या पक्षाकडून सुप्रीम कोर्टात याचिका दाखल करण्यात आली होती. त्यामुळे आजच्या सुनावणीत सुप्रीम कोर्ट काय निर्णय देणार? याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. तत्पूर्वी, पक्षाचे नाव आणि चिन्ह गमावल्यानंतर निवडणूक आयोगाकडून शरद पवार यांच्या पक्षाला राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी – शरदचंद्र पवार असे नाव देण्यात आले आहे. सोबतच त्यांना तुतारी हे नवीन पक्ष चिन्ह मिळाले आहे.