नवी दिल्ली, 29 जानेवारीः (विश्वजीत खाटमोडे) राष्ट्रवादीच्या आमदार अपात्रतेच्या याचिकेवर आज सुप्रीम कोर्टात सुनावणी पार पडली. यावेळी सुप्रीम कोर्टाने राष्ट्रवादीच्या आमदार अपात्रतेच्या याचिकेवर निकाल देण्यासाठी विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांना मुदतवाढ देण्याचा निर्णय घेतला आहे. त्यानूसार, राहुल नार्वेकर यांनी येत्या 15 फेब्रुवारीपर्यंत राष्ट्रवादीच्या आमदार अपात्रता प्रकरणी निकाल जाहीर करावा, असे आदेश सुप्रीम कोर्टाने दिले आहेत. त्यावेळी राहुल नार्वेकर हे कोणाच्या बाजूने निकाल जाहीर करणार? याकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे.
https://twitter.com/ANI/status/1751847886973972802?s=19
नार्वेकरांनी वेळ वाढवून मागितला होता!
यापूर्वी सुप्रीम कोर्टाने राष्ट्रवादीच्या आमदार अपात्रतेच्या याचिकेवर निर्णय घेण्यासाठी राहुल नार्वेकर यांना 31 जानेवारी पर्यंत मुदत दिली होती. तर राहुल नार्वेकर यांनी सुप्रीम कोर्टात अर्ज दाखल करून आपल्याला यासंदर्भात निकाल देण्यासाठी 3 आठवड्यांचा वेळ वाढवून द्यावा, अशी मागणी केली होती. मात्र, सुप्रीम कोर्टाने राहुल नार्वेकर यांना आज 15 फेब्रुवारीपर्यंत मुदतवाढ देण्याचा निर्णय घेतला आहे. दरम्यान, गेल्या काही दिवसांपूर्वी राहुल नार्वेकर यांनी शिवसेना पक्षाच्या आमदार अपात्रतेच्या याचिकेवर निकाल दिला होता. त्यावेळी त्यांनी ठाकरे आणि शिंदे गटाच्या एकाही आमदाराला अपात्र ठरवले नव्हते. सोबतच त्यांनी खरी शिवसेना ही शिंदे गटाची असल्याचा निकाल दिला होता. त्यामुळे राष्ट्रवादीच्या आमदार अपात्रतेप्रकरणी राहुल नार्वेकर अशाच प्रकारे निकाल जाहीर करतील, असे म्हटले जात आहे.
कोणाच्या बाजूने निकाल लागणार?
तत्पूर्वी गेल्या काही महिन्यांपूर्वी अजित पवार हे शरद पवारांची साथ सोडून महायुती सरकारमध्ये सहभागी झाले होते. यावेळी अजित पवारांना राष्ट्रवादीच्या बहुतांश आमदारांनी पाठिंबा दिला होता. त्यामुळे राष्ट्रवादी पक्षात शरद पवार गट आणि अजित पवार गट असे दोन गट पडले. त्यानंतर अजित पवार आणि शरद पवार गटाने एकमेकांच्या विरोधात आमदार अपात्रतेच्या याचिका दाखल केल्या होत्या. तसेच राष्ट्रवादी पक्ष आणि चिन्ह कोणाचे? याबाबत सध्या निवडणूक आयोगासमोर ही सुनावणी सुरू आहे. त्यामुळे यासंदर्भात कोणाच्या बाजूने निकाल लागणार? हे पाहणे देखील महत्त्वाचे ठरणार आहे.