राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाची तिसरी यादी जाहीर

मुंबई, 10 एप्रिल: (विश्वजीत खाटमोडे) आगामी लोकसभा निवडणुकीसाठी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाने आज आपल्या उमेदवारांची तिसरी यादी जाहीर केली आहे. यामध्ये त्यांनी 2 उमेदवारांच्या नावांची घोषणा केली आहे. तिसऱ्या यादीत राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाने सातारा लोकसभा मतदार संघातून शशिकांत शिंदे यांना उमेदवारी दिली आहे. तसेच रावेर मतदार संघातून श्रीराम पाटील यांना तिकीट देण्यात आले आहे. यासंदर्भातील माहिती राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाने ट्विट करून दिली आहे.

आतापर्यंत नऊ उमेदवारांची घोषणा

राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाने आतापर्यंत 9 उमेदवारांच्या नावांची घोषणा केली आहे. यामध्ये वर्धा येथून अमर काळे, दिंडोरी लोकसभा मतदार संघातून भास्कर भगरे, बारामतीतून सुप्रिया सुळे, शिरूर मधून अमोल कोल्हे, अहमदनगर मधून निलेश लंके, बीड मतदार संघातून बजरंग सोनवणे, भिवंडीतून सुरेश म्हात्रे, सातारा लोकसभा मतदार संघातून शशिकांत शिंदे आणि रावेर मतदार संघातून श्रीराम पाटील यांना लोकसभेची उमेदवारी देण्यात आली आहे.

माढातून कोणाला उमेदवारी मिळणार?

दरम्यान, महाविकास आघाडीचा जागा वाटपाचा फॉर्म्युला काल जाहीर करण्यात आला. यामध्ये शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाला सर्वाधिक 21 जागा मिळाल्या. तर या जागा वाटपात काँग्रेसला 17 आणि राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाला 10 जागा मिळाल्या आहेत. राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाकडून आतापर्यंत या 10 जागांपैकी 9 उमेदवार जाहीर करण्यात आले आहेत. तर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाने माढाच्या जागेवर अद्याप उमेदवार जाहीर केला नाही. या जागा वाटपात माढा लोकसभा मतदारसंघाची जागा शरद पवार यांच्या पक्षाला मिळाली आहे. त्यामुळे माढा लोकसभा मतदार संघातून राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्ष कोणाला उमेदवारी देणार? हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *