राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी – शरदचंद्र पवार पक्षाची पहिली यादी प्रसिद्ध! 5 उमेदवारांच्या नावांची घोषणा

मुंबई, 30 मार्च: (विश्वजीत खाटमोडे) आगामी लोकसभा निवडणुकीसाठी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी – शरदचंद्र पवार पक्षाने त्यांच्या उमेदवारांची पहिली यादी जाहीर केली आहे. यावेळी त्यांनी 5 उमेदवारांच्या नावांची घोषणा केली. यामध्ये सुप्रिया सुळे, अमोल कोल्हे आणि निलेश लंके या नेत्यांच्या नावांचा समावेश आहे. दरम्यान, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी – शरदचंद्र पवार पक्षाची ही पहिली यादी असून, येत्या काही दिवसांत त्यांच्याकडून आणखी काही उमेदवारांना संधी मिळणार असल्याची शक्यता वर्तविली जात आहे. त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी – शरदचंद्र पवार पक्षाकडून कोणकोणत्या नेत्यांना संधी दिली जाते? हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.

पहिल्या यादीत या नेत्यांची नावे

लोकसभा निवडणुकीसाठी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी – शरदचंद्र पवार पक्षाने आज त्यांच्या 5 उमेदवारांची पहिली यादी प्रसिद्ध केली. यामध्ये वर्धा मतदार संघातून अमर काळे, दिंडोरी मतदार संघातून भास्कर भगरे, बारामती मतदार संघातून सुप्रिया सुळे, शिरूर मतदार संघातून अमोल कोल्हे आणि अहमदनगर मतदार संघातून निलेश लंके यांना उमेदवारी देण्यात आली आहे.

शिरूर आणि नगरमध्ये काटे की टक्कर

त्यामुळे येत्या लोकसभा निवडणुकीत महायुतीच्या उमेदवारांसोबत या उमेदवारांची लढत होणार आहे. यामध्ये शिरूर आणि अहमदनगर मतदार संघात काटे की टक्कर पाहायला मिळणार आहे. शिरूर मतदार संघात राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी – शरदचंद्र पवार पक्षाचे नेते अमोल कोल्हे आणि अजित पवारांच्या राष्ट्रवादीत नुकतेच सामील झालेले शिवाजीराव आढळराव पाटील यांच्यात लढत होणार आहे. तसेच अहमदनर मतदार संघात अजित पवार यांच्या राष्ट्रवादीतून शरद पवार यांच्या पक्षात प्रवेश केलेले निलेश लंके यांचा सामना भाजप उमेदवार सुजय विखे पाटील यांच्यासोबत रंगणार आहे. त्यामुळे या लढतीकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. तर दूसरीकडे बारामती मतदार संघातून राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी – शरदचंद्र पवार पक्षाकडून सुप्रिया सुळे यांना उमेदवारी देण्यात आली आहे. त्यांचा सामना अजित पवार यांच्या पत्नी सुनेत्रा पवार यांच्यासोबत होणार असल्याची चर्चा सध्या सगळीकडे सुरू आहे. त्यांच्या उमेदवारीची घोषणा झाल्यास, यंदा बारामतीत प्रथमच पवार विरुद्ध पवार असा सामना पाहायला मिळणार आहे. मात्र, सुनेत्रा पवार यांना महायुतीकडून अजूनही उमेदवारी देण्यात आलेली नाही.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *