नाशिक, 06 फेब्रुवारी: नाशिक पोलिसांनी अवैध बांगलादेशी घुसखोरांविरोधात मोहिम सुरू केली आहे. त्यानुसार, पोलिसांनी नाशिक शहरात अवैधरित्या राहणाऱ्या 8 बांगलादेशी नागरिकांना अटक केली आहे. या प्रकरणी पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. याची माहिती नाशिक शहर पोलीस आयुक्त संदीप कर्णिक यांनी गुरूवारी (दि.06) दिली आहे.
https://x.com/ANI/status/1887484958245331086?t=dRgYD9JqHM_wLjzsOJMbzg&s=19
बांधकाम साईटवर पोलिसांचा छापा
दरम्यान, गेल्या आठवड्यात नाशिक शहरातील एका बांधकामाच्या ठिकाणी 600 लोकांमध्ये काही बांगलादेशी नागरिक काम करत असल्याची गुप्त माहिती पोलिसांना मिळाली होती. या मिळालेल्या माहितीच्या आधारे पोलिसांनी सापळा रचून संबंधित बांधकामाच्या साईटवर जाऊन या संशयित बांगलादेशी नागरिकांना ताब्यात घेतले. तसेच त्यांनी यावेळी पोलिसांनी त्यांची सखोल चौकशी केली. या चौकशीत आठजण बांगलादेशी नागरिक असल्याचे स्पष्ट झाले. याप्रकरणी पोलिसांनी त्यांना अटक केली आहे.
पोलीस चौकशीत माहिती उघड
अटक करण्यात आलेल्या या लोकांना भारतीय नागरिक असल्याचे पुरावे मागितले असता, ते पुरावे देऊ शकले नाहीत. यातील दोघांकडे आधारकार्ड असल्याचे आढळून आले आहे. चौकशीमध्ये त्यांनी सांगितले की, बांगलादेशमधील एका व्यक्तीने त्यांना सीमा ओलांडून भारतात येण्यास मदत केली होती. सुमन गाझी नावाचा व्यक्ती सर्वात आधी भारतात आला आणि त्याच्यामार्फत इतर लोक भारतात आले. या प्रकरणाची अधिक चौकशी करण्यासाठी पोलिसांनी या सर्वांच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे.
अटक केलेल्यांची नावे
याप्रकरणी पोलिसांनी आठ जणांना अटक केली आहे. सुमन कालाम गाझी (वय 27), अब्दुला अलीम मंडल (वय 30), शाहीन मफिजुल मंडल (वय 23), लासेल नुरअली शंतर (वय 23), आसाद अर्शदअली मुल्ला (वय 30), आलीम सुआनखान मंडल (वय 32), अलअमीन आमीनुर शेख (वय 22), मोसीन मौफीजुल मुल्ला (वय 22) अशी अटक केलेल्यांची नावे आहेत.
तपासासाठी विशेष यंत्रणांचा सहभाग
त्यावेळी पोलिसांनी त्यांच्याकडून मोबाईल फोन्स, आधार कार्ड, पॅन कार्डसह इतर कागदपत्रे जप्त केली आहेत. या बांगलादेशी नागरिकांनी भारतात प्रवेश कसा केला? आणि त्यांना भारतीय ओळखपत्रे कशी मिळाली? याचा शोध घेतला जात आहे. या प्रकरणाचा सखोल तपास नाशिक पोलिसांकडून सुरू आहे. तसेच एटीएस आणि राज्य गुप्तचर विभागासह अन्य तपास यंत्रणा देखील या बांगलादेशी नागरिकांची चौकशी करत आहे, असेही आयुक्त कर्णिक यांनी सांगितले आहे.