नाशिक, 13 जानेवारी: (विश्वजीत खाटमोडे) नाशिक-मुंबई महामार्गावरील उड्डाणपुलावर पिकअप आणि मिनी ट्रक यांच्यात झालेल्या अपघातात 6 जणांना जीव गमवावा लागला आहे. अन्य 13 जण जखमी झाले असून त्यापैकी 2 जणांची प्रकृती चिंताजनक आहे. जखमींवर जिल्हा रुग्णालयात उपचार सुरू असल्याची माहिती नाशिक पोलिसांनी दिली आहे. रविवारी (दि.12) सायंकाळी 7:30 वाजता ही दुर्दैवी घटना घडली. या अपघाताच्या घटनेनंतर नाशिक पोलिसांनी घटनास्थळी पोहोचून तपास सुरू केला आहे.
https://x.com/ANI/status/1878504861849071699?t=Rb21WqmXqKjbyghY2RVYsg&s=19
सिडको परिसरातून निघालेल्या या टेम्पोमध्ये हे प्रवासी होते. ते निफाड येथील एका धार्मिक कार्यक्रमातून घरी परतत होते. टेम्पो चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटले आणि त्याने लोखंडी रॉडने भरलेल्या ट्रकला पाठीमागून धडक दिली. या अपघातामुळे त्यातील काही जण घटनास्थळीच मृत्यूमुखी पडले. तर अनेकजण जखमी झाले. जखमींना जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले असून जखमींपैकी काहींची प्रकृती चिंताजनक असल्याची माहिती समोर आली आहे. या अपघातात 6 प्रवाशांचा मृत्यू झाला आहे. शरीरात लोखंडी गज शिरल्याने त्यांचा मृत्यू झाला. तर 13 जण जखमी झाले आहेत. टेम्पो चालकाच्या निष्काळजीपणामुळे हा अपघात झाला असल्याचे प्राथमिक तपासात पुढे आले आहे. तर या अपघाताचा पोलीस तपास करीत आहे.
https://x.com/CMOMaharashtra/status/1878674938279944282?t=QrPvTyIiSKs0hxz2YEJgZg&s=19
सरकारकडून आर्थिक मदत जाहीर
या दुःखद घटनेवर शोक व्यक्त करत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मृतांच्या कुटुंबीयांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण केली आहे. त्याचबरोबर, मुख्यमंत्री फडणवीस यांनी जाहीर केले आहे की, या अपघातात मृत्यू झालेल्या व्यक्तींच्या कुटुंबीयांना राज्य सरकारकडून 5 लाख रूपयांचे आर्थिक सहाय्य देण्यात येईल. तसेच, जखमींच्या उपचाराचा सर्व खर्च शासनाच्या वतीने केला जाईल. असे त्यांनी सांगितले.