माझी लाडकी बहीण योजनेसाठी नोंदणी करण्यासाठी ‘नारी शक्ती दूत’ हे ॲप उद्यापासून सुरू

मुंबई, 01 जुलै: (विश्वजीत खाटमोडे) मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसाठी नोंदणी करण्यास आजपासून सुरूवात झाली आहे. या पार्श्वभूमीवर, राज्याच्या महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी आज मंत्रालयात राज्यातील सर्व जिल्ह्याचे मुख्य कार्यकारी अधिकारी आणि जिल्हाधिकारी यांच्यासोबत बैठक घेतली. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण या योजनेची यशस्वीरित्या अंमलबजावणी करावी त्यासाठी आवश्यक दाखल्यांची जलदगतीने पूर्तता करावी, असे निर्देश यावेळी आदिती तटकरे यांनी सर्व अधिकाऱ्यांना दिले.

https://x.com/iAditiTatkare/status/1807789019440226629?s=19

नारी शक्ती दूत ॲप उद्यापासून सुरू

या योजनेच्या लाभार्थ्यांच्या नोंदणीचा पहिला टप्पा 1 जुलै ते 15 जुलै या कालावधीत असणार आहे. यानंतर ही प्रक्रिया निरंतर सुरू राहील. महिला भगिनी या अंगणवाडी सेविका, ग्रामसेवक, परिवेक्षिका, मुख्यसेविका, सेवा सुविधा केंद्र यांच्या सहाय्याने अर्ज करू शकतात. त्यानंतर या प्रतिनिधींनी ऑनलाईन पद्धतीने अर्ज शासनास सादर करावेत. तसेच, ज्या पात्र महिला स्वत: ऑनलाईन पद्धतीने अर्ज सादर करू शकतात त्यांच्यासाठी ‘नारी शक्ती दूत’ हे ॲप उद्यापासून सुरू करण्यात येत आहे, अशी माहिती आदिती तटकरे यांनी यावेळी दिली.

विविध प्रकारचे दाखले लवकर मिळावेत

सर्व पात्र महिलांना या योजनेचा लाभ मिळावा यासाठी निवासी दाखला, उत्पन्नाचा दाखला, जन्म दाखला अशा आवश्यक दाखल्यांची पूर्तता जलदगतीने करण्यात यावी. यासाठी गरज पडल्यास गावपातळीवर विशेष शिबिरांचे आयोजन करावे. अशा सूचना यावेळी आदिती तटकरे यांनी दिल्या. तसेच, जिल्हापातळीवर बँक अधिकारी यांच्याशी समन्वय साधून संबंधित महिलांचे शून्य जमा रकमेवर खाते सुरू ठेवण्यासंदर्भात सूचना द्याव्यात असेही स्पष्ट निर्देश दिले आहेत. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना यशस्वीरित्या राबविण्यासाठी सर्व यंत्रणांनी समन्वयाने व जलदगतीने काम करण्याच्या सूचना यावेळी आदिती तटकरे यांनी दिल्या.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *