दिल्ली, 15 जुलै: (विश्वजीत खाटमोडे) पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सोशल मीडियावर एक नवा विक्रम केला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे सोशल मीडिया प्लॅटफॉर्म X (ट्विटर) वर 100 दशलक्ष म्हणजेच 10 कोटी फॉलोअर्स झाले आहेत. यासोबतच पंतप्रधान मोदी हे ट्विटर वर सर्वाधिक फॉलोवर्स असलेले नेते बनले आहेत. गेल्या तीन वर्षांत ट्विटरवर पंतप्रधान मोदींचे सुमारे 30 दशलक्ष म्हणजेच 3 कोटी फॉलोवर्स वाढले आहेत. याशिवाय ट्विटर वरील फॉलोवर्सच्या बाबतीत जागतिक नेत्यांमध्ये ही भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी हेच अव्वल स्थानी आहेत. परंतु, पंतप्रधान मोदींपेक्षा जास्त फॉलोअर्स असलेले जगातील एकमेव राजकारणी म्हणजे अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष बराक ओबामा होय. बराक ओबामा यांचे ट्विटरवर 131 दशलक्ष म्हणजेच 13 कोटी 10 लाख फॉलोवर्स आहेत.
https://x.com/narendramodi/status/1812482830108426279?s=19
जागतिक नेत्यांमध्ये मोदी लोकप्रिय
तर यामध्ये नरेंद्र मोदी हे अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडेन आणि दुबईचे शासक एचएच शेख मोहम्मद यांच्या सारख्या जागतिक नेत्यांपेक्षा खूप पुढे आहेत. अमेरिकेचे जो बायडेन यांचे ट्विटरवर 38.1 दशलक्ष म्हणजेच 3 कोटी 81 लाख फॉलोवर्स आहेत. तर दुबईचे शासक एचएच शेख मोहम्मद यांचे ट्विटरवर 11.2 दशलक्ष म्हणजेच जवळपास 1 कोटी 12 लाख फॉलोवर्स आहेत. तसेच व्हॅटिकन सिटीचे नेते पोप फ्रान्सिस यांचे ट्विटरवर 18.5 दशलक्ष म्हणजेच 1 कोटी 85 लाख फॉलोवर्स आहेत. या बाबतीत देशातील नेत्यांमध्ये ही पंतप्रधान नरेंद्र मोदी हे 100 दशलक्ष फॉलोअर्स सह आघाडीवर आहेत. यामध्ये लोकसभेचे विरोधी पक्षनेते तथा कॉंग्रेस नेते राहुल गांधी यांचे ट्विटरवर सध्या 26.4 दशलक्ष म्हणजेच 2 कोटी 64 लाख फॉलोअर्स आहेत. तसेच यात दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांचे 27.5 दशलक्ष म्हणजेच 2 कोटी 75 लाख फॉलोवर्स आहेत. तर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांचे ट्विटरवर 2.9 दशलक्ष म्हणजेच 29 लाख फॉलोवर्स आहेत.
खेळाडू आणि सेलिब्रिटींना टाकले मागे
ट्विटरवरील फॉलोवर्सच्या संख्येत पंतप्रधान मोदी हे जागतिक खेळाडूंच्या ही पुढे आहेत. यामध्ये विराट कोहलीचे ट्विटरवर सध्या 64.1 दशलक्ष म्हणजेच 6 कोटी 41 लाख फॉलोअर्स आहेत. तसेच ब्राझीलचा फुटबॉलपटू नेमार जूनियरचे 63.6 दशलक्ष म्हणजेच 6 कोटी 36 लाख फॉलोअर्स, अमेरिकन बास्केटबॉल खेळाडू लेब्रॉन जेम्सचे 52.9 दशलक्ष म्हणजेच 5 कोटी 29 लाख फॉलोअर्स आहेत. त्याचवेळी ट्विटर फॉलोअर्सच्या बाबतीत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आंतरराष्ट्रीय सेलिब्रिटींना देखील केंव्हाच मागे टाकले आहे. यात अमेरिकन गायिका टेलर स्विफ्टचे ट्विटरवर 95.3 दशलक्ष म्हणजेच 9 कोटी 53 लाख फॉलोअर्स आहेत.